चिमुकल्यांच्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगची दखल... हिवरापहाडीच्या शाळेला अखेर मिळाला शिक्षक...

Share:
Main Image
Last updated: 29-Sep-2026

 

बीड, (प्रतिनिधी) २९ सप्टेंबर - "आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या..." अशी आर्त हाक मारणाऱ्या हिवरापहाडी (ता. बीड) येथील चिमुकल्या विद्यार्थिनींच्या सोशल मीडिया रिपोर्टिंगची उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने वेगाने हालचाली करत शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती केली असून ते रुजूही झाले आहेत.

नेमके काय घडले होते?

बीड जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरापहाडी (केंद्र जरूड) ही दुर्गम भागातील शाळा आहे. या शाळेत गेल्या काही दिवसांपासून गणित, विज्ञान आणि संगणक या अत्यंत महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नव्हते.

शिक्षकांअभावी अभ्यास अडकल्याने संतप्त आणि चिंताग्रस्त चिमुकल्या मुलींनी थेट 'अभिरुप बातमीपत्र' तयार केले. त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्लास्टिक बॉटलचा 'माईक' बनवला आणि वर्गातूनच थेट रिपोर्टिंग करत आपली व्यथा मांडली. या अनोख्या आंदोलनाचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Advertisement

उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश अन् प्रशासनाची जलद कारवाई

या व्हिडिओची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्हा प्रशासनाला तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. वरिष्ठ स्तरावरून आदेश मिळताच बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभाग 'ॲक्शन मोड'मध्ये आले.

प्रशासनाने तात्काळ आदेश काढून शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती केली. आदेश मिळताच जोगदंड हे शाळेत रुजू झाले असून, यामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. चिमुकल्या मुलींच्या जागरूकतेचे आणि सरकारच्या या जलद निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Comments

No comments yet.