हॉटेल व्यावसायिकावर चाकूने प्राणघातक हल्ला... किटली आडवी केल्याने बालंबाल बचावले...

Share:
Main Image
Last updated: 28-Sep-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २८ सप्टेंबर - पूर्ववैमनस्यातून एका माथेफिरू तरुणाने हॉटेल व्यावसायिकावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जुने नाशिक परिसरातील शिवाजी चौकात घडली. जीवे मारण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या हल्ल्यात ६२ वर्षीय ज्येष्ठ व्यावसायिक गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने, त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चहा ओतताना अचानक काढला चाकू

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र केशव उदावंत (वय ६२, रा. शिवाजी चौक, कथडा, जुने नाशिक) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. उदावंत यांचा राहत्या घराच्या परिसरातच 'ऋषिकेश' नावाचा हॉटेलचा व्यवसाय आहे. रविवारी (दि. २७) सायंकाळच्या सुमारास उदावंत नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये काम करत ग्राहकांना सेवा देत होते.

Advertisement

त्याच वेळी नानावलीस राहणारा संशयित सोहम उर्फ बाबू विजेंद्र बिडलॉन हा ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये आला. उदावंत हे संशयित बसलेल्या बाकड्यावर किटलीतून कपामध्ये चहा ओतत असताना, पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून सोहम याने अचानक कमरेला लावलेला तीक्ष्ण चाकू बाहेर काढला आणि उदावंत यांच्यावर हल्ला केला.

किटली आडवी केल्याने बालंबाल बचावले!

हल्लेखोराने उदावंत यांच्या तोंडावर चाकूने वार करत, थेट पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, ६२ वर्षीय उदावंत यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत हातातील चहाची किटली तात्काळ पुढे केली. किटली आडवी आल्यामुळे चाकूचा वार थेट पोटात न बसता चकवला गेला आणि ते बालंबाल बचावले. तरीही या हल्ल्यात त्यांच्या तोंडावर व हातावर गंभीर दुखापत झाली असून त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.

हल्ल्यानंतर परिसरात एकच घबराट पसरली. स्थानिक नागरिकांनी जखमी उदावंत यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी राजेंद्र उदावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सोहम उर्फ बाबू विजेंद्र बिडलॉन याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गिरी करत आहेत.

 

Comments

No comments yet.