नाशिक, (प्रतिनिधी) २८ सप्टेंबर - नाशिक शहरात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विनयभंगाच्या चार वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून, यामध्ये दोन शाळकरी मुलींसह दोन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नातेवाइकांनीच दोन महिलांचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भद्रकाली, अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१. शिकवणीवरून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाड (अंबड पोलीस ठाणे)
सिडको परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत शनिवारी (दि. २६) रात्री शिकवणीवरून (ट्यूशन) पायी घराकडे जात होती. गौरी शंकर मंगल कार्यालयाच्या पाठीमागील रस्त्यावरून जात असताना, वाटेत सिगारेट ओढत उभ्या असलेल्या सौरभ राजू सोनवणे या संशयित तरुणाने मुलीला पाहून अश्लील हावभाव केले. एवढेच नव्हे तर त्याने पेटती सिगारेट पीडित मुलीच्या अंगावर फेकली. या धक्कादायक प्रकारानंतर मुलीने त्याला जाब विचारला असता संशयिताने तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नाली पलांडे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
२. शाळेच्या आवारात पाठलाग अन् जीवे मारण्याची धमकी (सातपूर पोलीस ठाणे)
दुसरी घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. शिवनगर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा आर्यमान किशोर म्हामुनकर (वय २३, रा. परमोरी लखमापूर फाटा, ता. दिंडोरी) हा तरुण सातत्याने पाठलाग करून त्रास देत होता. शुक्रवारी (दि. २५) सकाळी हिंदी शाळा परिसरात त्याने मुलीची वाट अडवून तिचा विनयभंग केला. त्यानंतर रविवारी पुन्हा भररस्त्यात त्याने हेच कृत्य रिपीट केले. घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन पालकांना आपबिती सांगितली. कुटुंबीयांनी आरोपीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ करत पीडित मुलीस थेट जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पवार तपास करत आहेत.
३. हॉटेलमध्ये दिराने केला वहिनीचा विनयभंग (भद्रकाली पोलीस ठाणे)
तिसरी घटना सारडा सर्कल परिसरातील हॉटेल एस. एम. इम्पेरियल येथे घडली. पीडित विवाहिता शनिवारी (दि. २६) रात्री आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. यावेळी खडकाळी परिसरात राहणाऱ्या तिच्या स्वतःच्या दिराने विचारपूस करण्याच्या बहाण्याने जवळ येऊन तिचा विनयभंग केला. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी तपास करत आहेत.
४. घरात साफसफाई करताना दीराची असभ्य वर्तणूक (अंबड पोलीस ठाणे)
चौथी घटना सिडको परिसरात घडली. पीडित महिला आपल्या राहत्या घरात साफसफाई करत असताना तिच्या पतीच्या मोठ्या भावाने (जेठ) तिच्याशी असभ्य वर्तणूक करत विनयभंग केला. महिलेने तात्काळ प्रसंगावधान राखून तीव्र प्रतिकार केला असता संशयिताने तिला मारहाण करून शिवीगाळ केली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार रफिक शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
एकाच वेळी शहरात घडलेल्या या चार घटनांमुळे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्यांवर, शाळा-ट्यूशनच्या परिसरात मोकाट फिरणाऱ्या रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, तसेच कौटुंबिक पातळीवर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.