दिव्यांग विद्यार्थ्यांना दया नव्हे, समान संधी आणि सन्मानाची गरज... मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

Share:
Main Image
Last updated: 28-Sep-2026

 

येवला, (प्रतिनिधी) २८ सप्टेंबर - विशेष मुलांच्या आयुष्यात शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नवी दिशा निर्माण करणाऱ्या समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयाचा रौप्य महोत्सव हा केवळ एका संस्थेच्या २५ वर्षांच्या कार्याचा उत्सव नसून, असंख्य विद्यार्थ्यांच्या संघर्षातून आणि जिद्दीमधून उभ्या राहिलेल्या यशोगाथेचा गौरव आहे. दिव्यांगत्व म्हणजे क्षमता संपणे नव्हे, तर क्षमता व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. योग्य संधी, मार्गदर्शन आणि सुविधा मिळाल्यास दिव्यांग विद्यार्थी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करू शकतात, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. प्रा.अर्जुन कोकाटे यांच्या समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.

समता प्रतिष्ठान येवला संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, माजी आमदार लहू कानडे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, लोककवी अरुण म्हात्रे, संभाजी पवार, प्रकाश दायमा, सुरेश पवार, अनिल कुंदे, प्रा. शिरीष गंधे, प्रा. अनिता गंधे, किशोर राठी, शिवाजी सुरोसे,प्रकाश देवरे, रमेश पाटील, प्रा.अर्जुन जाधव,राजेश भांडगे, शिवाजीराव ढेपले, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, प्रकाश साबरे, संध्या पगारे, बापूसाहेब गुरव, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, दि. ११ जून १९९९ रोजी ज्येष्ठ समाजसुधारक साने गुरुजी यांच्या प्रेरणादायी स्मृतींना अभिवादन करून मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. विशेष मुलांसाठी शिक्षणाची सुविधा निर्माण करणे, निवासी व्यवस्था उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हे त्या काळात मोठे आव्हान होते. मात्र या आव्हानांना न घाबरता समता प्रतिष्ठानने सेवाभावी वृत्ती, जिद्द आणि सातत्याच्या बळावर आपला प्रवास सुरू ठेवला. आज २५ वर्षांनंतर मायबोली विद्यालयाने सामाजिक क्षेत्रात निर्माण केलेला ठसा निश्चितच उल्लेखनीय आहे. मायबोली ही केवळ शाळा नाही, तर अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे. ती केवळ शिक्षणसंस्था नाही, तर विशेष मुलांच्या आत्मनिर्भरतेची आणि स्वाभिमानाची शाळा आहे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, आज या विद्यालयात सुमारे १२० विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत आहेत. उपलब्ध साधनसुविधांच्या मर्यादा असतानाही विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणासोबत व्यावसायिक प्रशिक्षण, कला, क्रीडा, चित्रकला आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासाची संधी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.दिव्यांगत्वाकडे केवळ मर्यादा म्हणून पाहण्याची मानसिकता समाजाने बदलली पाहिजे. दिव्यांगत्व शरीराच्या एखाद्या क्षमतेवर मर्यादा आणू शकते; मात्र माणसाच्या स्वप्नांना, जिद्दीला आणि कर्तृत्वाला मर्यादा घालू शकत नाही. योग्य संधी मिळाल्यास दिव्यांग बांधव समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देऊ शकतात, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Advertisement

यासाठी जगभरातील तसेच भारतातील अनेक प्रेरणादायी उदाहरणे त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी शारीरिक मर्यादांवर मात करून विज्ञानाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. हेलन केलर यांनी बहिरेपणा आणि अंधत्वावर मात करून लेखिका, व्याख्याता आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जागतिक ओळख निर्माण केली. सुधा चंद्रन, अरुणिमा सिन्हा, दीपा मलिक, गिरीश शर्मा, इरा सिंघल आणि डॉ. सुरेश आडवाणी यांच्यासह अनेकांनी आपल्या कर्तृत्वातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा आदर्श निर्माण केला आहे. पॅरा क्रीडा क्षेत्रातही भारतातील दिव्यांग खेळाडूंनी जागतिक स्तरावर देशाचा गौरव वाढविला आहे. सचिन खिलारी, शीतल देवी, अवनी लेखरा, देवेंद्र झाझरिया, सुमित अंतिल, मरियप्पन थंगावेलू, प्रमोद भगत, मनीष नरवाल, निशाद कुमार आणि योगेश कथुनिया यांच्यासारख्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून दिव्यांगत्वाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास हातभार लावला आहे. नाशिक जिल्ह्यातील पॅरा क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनीही उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचा गौरव वाढविला असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, दिव्यांग बांधवांना दया नको, तर समान संधी हवी. सहानुभूतीपेक्षा सन्मान आणि केवळ मदतीपेक्षा सक्षम होण्यासाठी व्यासपीठ आवश्यक आहे. समाजाने त्यांच्या अडचणींपेक्षा त्यांच्या क्षमतांकडे पाहिले पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समानतेने सहभागी करून घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

विशेष मुलांच्या जीवनात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ अभ्यासक्रम शिकविणे एवढेच त्यांचे काम नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांच्या क्षमतांचा शोध घेणे, अडचणी समजून घेणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही मोठी जबाबदारी शिक्षक पार पाडतात. मायबोली विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गेल्या २५ वर्षांत ही जबाबदारी निष्ठेने पार पाडली असून त्यांचे योगदान अभिनंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या काळात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे नाही. त्यांना कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, रोजगाराभिमुख शिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभा राहावा, हीच शिक्षणाची खरी फलश्रुती आहे. मायबोली विद्यालयाच्या पुढील वाटचालीत कौशल्यविकास आणि आत्मनिर्भरतेवर अधिक भर देण्यात यावा. संस्थेने गेल्या २५ वर्षांत केलेल्या कार्याचा विस्तार पुढील काळात अधिक व्यापक व्हावा आणि अधिकाधिक विशेष मुलांना त्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तसेच दिव्यांग बांधवांसाठी अधिक सक्षम आणि समावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि समाज या सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. विशेष विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगार, कौशल्य आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

 

Comments

No comments yet.