मनोहर शिंदे, (नाशिक) २८ सप्टेंबर - शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि राज्यभरात बनावट शिक्षक भरतीचे जाळे पसरवणाऱ्या बहुचर्चित ‘शालार्थ आयडी’ (Shalarth ID) घोटाळ्याचा छडा लावण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने मोठा पाऊल उचलले आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी ‘विशेष तपास पथक’ (SIT) स्थापन करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी कार्यरत राहणार असून, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांसाठी तब्बल १० सहाय्यक पथके नेमण्यात आली आहेत.
नाशिकरोड पोलिसांत दाखल गुन्ह्यांची पाळेमुळे खोलवर
नाशिकरोड पोलीस ठाण्यात शालार्थ आयडीच्या गैरव्यवहारासंदर्भात गु.र.नं. १६४/२०२५ आणि २१६/२०२६ असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे, संगनमत करणे यासह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) कलम ६६, ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हे नोंदवले गेले आहेत. हे प्रकरण केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून, सरकारी तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या या महाघोटाळ्याची व्याप्ती राज्यातील अनेक जिल्ह्यांत पसरल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयाने अत्यंत बारकाईने आणि जलदगतीने तपासाची चक्रे फिरवण्यासाठी विशेष आदेश जारी केले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तपास; १२ जणांचे मुख्य पथक
या महाघोटाळ्याच्या तपासासाठी गठीत करण्यात आलेल्या मुख्य एसआयटी पथकाचे प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण जबाबदारी सांभाळणार आहेत. गु.र.नं. २१६/२०२६ चा तपास अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्याकडे, तर गु.र.नं. १६४/२०२५ चा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याशिवाय, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे यांच्यासह श्रेपोउपनि अनिल चव्हाण, पोहवा शिवाजी कुळकर्णी, पोअं वैभव खांडेकर, रेहान शेख, योगेश पवार आणि अनिरुद्ध येवले यांचा मुख्य पथकात समावेश करण्यात आला आहे.
जिल्हानिहाय १० सहाय्यक पथके सज्ज
घोटाळ्याचा सुगावा लावण्यासाठी मुख्य पथकाला सहकार्य करण्यासाठी १० विशेष सहाय्यक पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे:
* जळगाव जिल्हा : पथक क्रमांक १ (पंचवटी पो.स्टे.), पथक २ (भद्रकाली पो.स्टे.), पथक ३ (आडगाव पो.स्टे.), पथक ४ (गंगापूर पो.स्टे.) आणि पथक ५ (सरकारवाडा, मुंबईनाका, म्हसरूळ) हे जळगाव जिल्ह्यातील तपासाची धुरा सांभाळतील.
* धुळे व नंदुरबार जिल्हा : पथक क्रमांक ६ (अंबड पो.स्टे.) व पथक ७ (सातपूर पो.स्टे.) यांच्याकडे धुळे जिल्ह्याची, तर पथक ८ (नाशिकरोड पो.स्टे.) कडे धुळे व नंदुरबार जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
* नाशिक जिल्हा : पथक क्रमांक ९ (उपनगर पो.स्टे.) आणि पथक १० (मुंबईनाका, इंदिरानगर, एमआयडीसी, देवळाली कॅम्प) हे नाशिक शहर व जिल्ह्यातील संशयितांच्या मुसक्या आवळणार आहेत.
प्रत्येक सहाय्यक अधिकाऱ्याला तपासात कागदपत्रांची पूर्तता व मदत करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांकडून प्रत्येकी दोन अंमलदार 'लेखनिक' म्हणून तातडीने देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पोलिसांच्या या व्यापक कारवाईमुळे शिक्षण विभाग, संस्थाचालक आणि शालार्थ आयडीच्या रॅकेटमधील दलालांचे धाबे दणाणले आहेत.