गर्भवतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले... बीड, कळंब ते धुळे... असा उघडकीस आला भयानक कट...

Share:
Main Image
Last updated: 28-Sep-2026

 

धुळे, (प्रतिनिधी) २८ सप्टेंबर - कलाकेंद्रातील अंतर्गत वादाच्या तीव्र रागातून एका गरोदर महिलेचे अपहरण करून तिला तब्बल २७५ किलोमीटर दूर धुळे जिल्ह्यात आणण्यात आले. त्यानंतर एका निर्जन वनक्षेत्रात तिच्यावर पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ ओतून जिवंत जाळून ठार मारल्याची अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ शिवारातील गरताडबारी घाटात आढळलेल्या एका अनोळखी गरोदर महिलेच्या या निघृण खुनाचा मोहाडीनगर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणात सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली असून पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर दोघे जण अद्याप फरार आहेत.

नेमकी घटना काय?

२२ सप्टेंबर २०२६ रोजी धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ शिवारात असलेल्या गरताडबारी घाटातील मुरमाड टेकडीजवळ वनक्षेत्रात एका अनोळखी महिलेचा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर ती महिला गरोदर असल्याचे आणि तिचा तसेच तिच्या पोटातील निष्पाप गर्भाचा होरपळून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी २३ सप्टेंबर रोजी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महिला पूर्णपणे जळाल्यामुळे तिची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व मोहाडीनगर पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी बारीक सारीक परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले.

सीसीटीव्ही फुटेज अन् तांत्रिक तपासाने दिला धागा

ओळख पटत नसल्याने पोलिसांनी महामार्गावरील विविध टोल नाके आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची सलग व बारकाईने तपासणी सुरू केली. तपासादरम्यान एक हुंडाई मोबीलो गाडी (MH-43-AR-4070) संशयास्पद रित्या वावरताना पोलिसांच्या रडारवर आली. या वाहनाच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि तपासाची योग्य दिशा निश्चित झाली. पोलिसांच्या पथकाने तातडीने हालचाली करत जामखेड येथील 'सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रा'तून चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसी खाक्या दाखवताच या हत्येचा भीषण कट आणि इतर साथीदारांची माहिती समोर आली.

चार आरोपी अटकेत, दोघे फरार

Advertisement

या प्रकरणात पोलिसांनी सर्फराज उर्फ शफीक अलीम मोमीन (वय ३८, रा. गांधी नगर, कळंब), आरिफ उर्फ खुज्या आसीफ शेख (वय ३१, रा. कळंब), स्वाती उर्फ आरती गणेश कुन्हाडे (वय २८, रा. जामखेड) आणि लक्ष्मी बालाजी पवार (वय ३०, रा. कळंब) या चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर फारुख शेख आणि रोहिणी जाधव हे दोघे अद्याप फरार असून पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत.

मारहाणीनंतर बेशुद्ध; मृत समजून जाळण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव पिंकी हनुमंत काटकर (वय ३१, रा. रायगड) असे आहे. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा चौफुलीजवळील एका घरात आरोपींनी कलाकेंद्रातील वादातून पिंकीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. मात्र, ती मृत झाल्याचा गैरसमज आरोपींचा झाला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी तिला गाडीत टाकले आणि राजस्थानच्या दिशेने पळ काढला.

प्रवासादरम्यान धुळे जिल्ह्यातील गरताडबारी घाटातील निर्जन वनक्षेत्रात त्यांनी गाडी थांबवली. तिथे पिंकी अजूनही जिवंत असतानाच तिच्या अंगावर पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ ओतून तिला जाळून मारण्यात आले.

गुन्हेगारी पार्श्वभूमी अन् पोलिसांची कामगिरी

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सर्फराज उर्फ शफीक अलीम मोमीन हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यापासून ते अवघ्या ७२ तासांत या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा पर्दाफाश केल्याबद्दल पोलीस पथकाचे कौतुक होत आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, नितीन करंडे, अशोक पायमोडे तसेच अंमलदार निलेश पाटील, राहुल पाटील, प्रेमराज पाटील, ललिता मराठे, रजनी नाईक व बापुजी पाटील यांच्या पथकाने केली.

 

Comments

No comments yet.