मुंबई, (प्रतिनिधी) २८ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांच्या ८ व्या ई-लिलावामध्ये (2026) महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक वारसा, लोककला आणि आधुनिक पायाभूत सुविधांचे दर्शन घडवणाऱ्या स्मृतीचिन्हांना मानचे स्थान मिळाले आहे. या संपूर्ण संग्रहातील ८९ स्मृतीचिन्हांमधून महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास, अध्यात्म, क्रीडानैपुण्य आणि विकासकामांचे यथोचित दर्शन घडत आहे.
हा ई-लिलाव २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, नागरिकांना pmmementos.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या लिलावात सहभागी होता येईल.
ई-लिलावातील महाराष्ट्राच्या मुख्य कलाकृती आणि आकर्षणे:
* छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी वारसा:
या संग्रहाची मुख्य संकल्पना शिवरायांचा वारसा हीच आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ, सिंहासनाधिष्ठित, भव्य पुतळे, लाकडातील कोरीवकामे, तैलचित्रे आणि रायगडावरील ऐतिहासिक मेघडंबरीची प्रतिकृती यांचा समावेश आहे.
* महाराष्ट्राची भक्ती परंपरा:
वारकरी आणि भक्ती संप्रदायाचे प्रतीक म्हणून वीणा घेतलेले संत तुकाराम महाराज आणि ध्यानस्थ मुद्रेतील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मनमोहक प्रतिमांचा या संग्रहात समावेश आहे.
* जागतिक कीर्तीची 'वारली' लोककला:
महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारली चित्रशैलीच्या विविध कलाकृती लिलावात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये वारली भरतकामातून साकारलेले आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचे चित्र, ग्रामीण जीवन, शेती, सण आणि उत्सव दर्शवणाऱ्या पारंपरिक भौमितिक वारली चित्रांचा समावेश आहे.
* क्रीडा क्षेत्रातील अभिमानास्पद यश:
महाराष्ट्रातील खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीच्या आठवणीही या लिलावात पाहायला मिळत आहेत. यात दिव्यांग बॅडमिंटनपटू सुकांत कदम यांचे स्वाक्षरी केलेले बॅडमिंटन रॅकेट, तसेच २०२४ पॅरिस ऑलिंपिक गाजवणारे सचिन खिलारी यांची बॅग आणि गोळाफेकीतील गोळा (Shot Put) या वस्तूंचा समावेश आहे.
* आधुनिक महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा:
राज्यातील विकासाचे प्रकल्प दर्शवणाऱ्या प्रतिकृतींचा यात समावेश आहे, जसे की:
* वाढवण बंदर
* ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प
* नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
* महापुरुषांचा गौरव:
भारताच्या सामाजिक व बौद्धिक जडणघडणीत योगदान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि श्रीमंत पेशवे पहिले बाजीराव यांचे पुतळे व चित्रे या संग्रहाचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत.
नागरिकांना लिलावात सहभागी होण्याची संधी
पंतप्रधानांच्या या स्मृतीचिन्हांच्या लिलावातून प्राप्त होणारी रक्कम ही राष्ट्रीय महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमांसाठी वापरली जाते. या ऐतिहासिक आणि कलात्मक स्मृतीचिन्हांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी आणि बोली लावण्यासाठी नागरिकांनी pmmementos.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.