दुकानात शिरून ज्वेलर्स व्यावसायिकावर हल्ला..

Share:
Last updated: 19-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ जानेवारी - सराफ दुकानात शिरून एकाने व्यावसायिकावर हल्ला केल्याची घटना मखमलाबाद येथे घडली. या घटनेत संशयिताने दुकानाची काच फोडून हल्ला केल्याने व्यावसायीक जखमी झाले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामकृष्ण गंगानाथ झा उर्फ चुन्ड्डी (रा.मखमलाबाद) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत धीरज रत्नाकर सोनार (रा.स्वामीविवेकानंद नगर मखमलाबाद) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 

सोनार यांचे मखमलाबाद गावात प्रांजल ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. शुक्रवारी (दि.१६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास वाढवण्याच्या तयारीत असतांना ही घटना घडली. दुकानात शिरलेल्या संशयिताने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. 

यावेळी सोनार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त संशयिताने शिवीगाळ करीत काऊंटरची काच फोडली. या काचेने सोनार यांच्यावर हल्ला करण्यात आला असून त्यात ते जखमी झाले आहेत. 

अचानक झालेल्या या हल्यात सोनार यांनी आरडाओरड केल्याने संशयिताने काढता पाय घेत पोबारा केला असून या गुह्याचा तपास हवालदार गवारे करीत आहेत. संशयित चुन्डी नामक तरूणाची मखलमाबाद गाव व परिसरात मोठी दहशत असून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.

नाशिक शहरात दोघांची आत्महत्या
 शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोघांनी रविवारी (दि.१८) गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. त्यात २८ वर्षीय तरूणासह २१ वर्षीय युवतीचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत म्हसरूळ व गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

मखमलाबाद येथील कुंभारगल्लीत राहणाऱ्या दर्शन ज्ञानेश्वर अभंग या युवकाने रविवारी सकाळी राहत्या घरातील लोखंडी अ‍ॅगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता.

 बेशुध्द अवस्थेत भाऊ संदिप अभंग याने त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार फुलपगारे करीत आहेत.

 दुसरा प्रकार औद्योगिक वसाहतीतील ध्रुवनगर भागात घडला. दिक्षा दत्तू त्रिभुवन (रा.शिल्पा आनंद अपा.संततुकाराम क्रिडांगण, ध्रुवनगर) या युवतीने रविवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. 

भाऊ दत्तू त्रिभुवन यांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ. सुमीत श्रावणे यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.