४०० हून अधिक स्वयंसेवक गोदापात्रात उतरले... केले हे जबरदस्त काम...

Share:
Main Image
Last updated: 27-Sep-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २७ सप्टेंबर - गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकांनंतर गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि घाटांचे पावित्र्य राखण्यासाठी 'नाशिक प्लॉगर्स' संस्थेच्या वतीने शनिवार, २६ सप्टेंबर रोजी गोदा घाटावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ४०० हून अधिक स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष नदीपात्रात उतरून तब्बल १,४५२ गणेशमूर्ती सुरक्षितपणे बाहेर काढल्या. विशेष म्हणजे, या उपक्रमासह नाशिक प्लॉगर्सने आपल्या अविरत सेवेचा ४५० व्या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पाही गाठला.

पाण्यात मानवी साखळी, किनाऱ्यावर कचरामुक्ती

शनिवारी सकाळी गोदा घाटावर पर्यावरणप्रेमी आणि महाविद्यालयीन तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. स्वयंसेवकांनी नदीपात्रात उतरून शिस्तबद्ध मानवी साखळ्या तयार केल्या. नदीच्या तळाशी राहिलेल्या तसेच किनाऱ्यावर अडकलेल्या लहान-मोठ्या गणेशमूर्ती हाताने पुढे सरकवत अत्यंत आदराने व सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्या.

एकीकडे मूर्ती बाहेर काढण्याचे काम सुरू असतानाच, दुसऱ्या पथकाने संपूर्ण घाट परिसराची स्वच्छता हाती घेतली. विसर्जनादरम्यान घाटावर साचलेला प्लॅस्टिक कचरा, निर्माल्य, थर्माकोल, सजावटीचे साहित्य आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर चकाचक करण्यात आला.

Advertisement

विविध संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

ही संयुक्त मोहीम युनायटेड वी स्टँड फाउंडेशन, सेंट लॉरेन्स, सीएमसीएस कॉलेज, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, सेवांकुर भारत आणि गुरु गोविंद सिंग कॉलेज यांच्या सहकार्याने पार पडली. विविध वयोगटातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत पर्यावरण रक्षणाचा एकमुखी संदेश दिला.

१३ हजार स्वयंसेवकांचे पाठबळ

नाशिक प्लॉगर्सचे संस्थापक तेजस तलवारे, प्रणव बागुल आणि उपाध्यक्ष अथर्व कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली. संस्थेच्या आजवरच्या मोहिमांमध्ये तब्बल १३ हजार स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला असून, लोकसहभागातून गोदावरी संवर्धनाचा हा लढा सुरू आहे. मोहीम पूर्ण झाल्यानंतर ४५० व्या मोहिमेचा टप्पा सर्व सहभागी स्वयंसेवक व सहयोगी संस्थांचा गौरव करून साजरा करण्यात आला.

 

Comments

No comments yet.