येवला, (प्रतिनिधी) २७ सप्टेंबर - पावसाने मारलेली दीर्घ ओढ, खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव आणि उत्पादनात प्रचंड घटीची धास्ती अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर धाव घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदल्या दिवशीचा नियोजित दौरा डॉक्टरांच्या सल्ल्याने रद्द करावा लागला असतानाही, आजारपणावर मात करत केवळ शेतकऱ्यांप्रती असलेल्या तळमळीतून त्यांनी येवला तालुक्यातील राजापूर परिसराला भेट देऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर येवला येथील संपर्क कार्यालयात सर्व विभागांची मॅरेथॉन आढावा बैठक घेऊन निफाड तालुक्याला दुष्काळ सवलतींच्या शासन निर्णयातून वगळल्याबाबत तातडीने फेरपडताळणी अहवाल सादर करण्याचे आणि येवल्यात दुष्काळी सवलतींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे कडक निर्देश दिले.
आजारपणावर मात करत बांधावर हजेरी
मंत्री भुजबळ यांचा दौरा शनिवारी प्रकृती बिघडल्याने रद्द झाला होता. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन त्यांनी रविवारी तातडीने शेतात हजेरी लावली. राजापूर परिसरात पावसाच्या खंडामुळे करपलेली पिके, पाण्याची खालावलेली पातळी आणि कीड-रोगांच्या प्रादुर्भावाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेत भुजबळ यांनी उपस्थित कृषी व महसूल अधिकाऱ्यांना नुकसानीचे कोणतेही कागदी घोडे न नाचवता वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्याचे आदेश दिले.
निफाडच्या समावेशासाठी तातडीने फेरपडताळणी
पाहणी दौऱ्यानंतर येवला संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत भुजबळ यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. २६ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयात निफाड तालुक्यात पावसाचा मोठा खंड असूनही समावेश झालेला नाही, यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निफाड तालुक्यातील देवगाव, विंचूर, लासलगाव व नांदूरमध्यमेश्वर या मंडळांमधील पावसाचा खंड, पिकांचे नुकसान आणि उत्पादनातील घट याची वस्तुनिष्ठ फेरपडताळणी करून शासनाला नव्याने अहवाल पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच पीक कापणी प्रयोगात पाटचारी लगतची जमीन न निवडता प्रत्यक्ष प्रातिनिधिक भागांची निवड करून अचूकता राखावी, असे बजावले.
सवलतींची तात्काळ अंमलबजावणी व टंचाई नियोजन
खरीप २०२६ मधील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यात जमीन महसुलात सूट, पीक कर्ज पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीस स्थगिती, वीज बिलात सवलत, परीक्षा शुल्क माफी आणि रोहयोच्या कामांतील शिथिलतेचा लाभ तात्काळ द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. येवला व निफाडमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर, पशुधनासाठी चारा डेपो, जनावरांचे लसीकरण आणि वन्यजीवांसाठी पाण्याच्या साठ्यांची तयारी पूर्ण ठेवण्याचे निर्देश दिले. सोबतच रब्बी हंगामासाठी कमी पाण्याच्या पिकांना प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांची ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी वेगाने पूर्ण करण्यास सांगितले.
नवरात्रोत्सव व मुक्तीदिनासाठी चोख नियोजन
कोटमगाव येथे ११ ऑक्टोबरपासून सुरू होणारा जगदंबा देवी नवरात्रोत्सव आणि १३ ऑक्टोबर रोजी येवला येथे होणाऱ्या मुक्तीदिन कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक व अनुयायी उपस्थित राहणार असल्याने पाणी, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य व सुरक्षेचे चोख नियोजन आगाऊ करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीस उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, शशिकांत मंगरुळे, तहसीलदार आबा महाजन, विशाल नाईकवाडी, उपविभागीय कृषी अधिकारी बटू पाटील, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, माजी जि.प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राजेंद्र लोणारी आदी उपस्थित होते.