धक्कादायक... पार्टनरशिप फार्ममध्ये मोठा झोल... तब्बल साडेतीन कोटींचा गंडा...

Share:
Main Image
Last updated: 27-Sep-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २७ सप्टेंबर - भागीदारी फर्ममधून मूळ भागीदाराला कसलीही पूर्वकल्पना न देता, बनावट दस्तऐवजांच्या आधारे परस्पर निवृत्त भासवून तब्बल साडेतीन कोटी रुपयांचे बँक कर्ज लाटल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. संशयितांनी भागीदारीतील मौल्यवान जमीन तारण ठेवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गंभीर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

या प्रकरणी संतोष मुरलीधर उशीर (वय ५१, व्यवसाय - व्यापार व शेती, रा. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी उशीर हे 'टॉप सेल कॉर्पोरेशन' या भागीदारी फर्मचे भागीदार आहेत. मात्र, संशयितांनी १८ मार्च २०२५ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कट कारस्थान रचले. सीबीएस रोडवरील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात 'Admission Cum Retirement' या नावाने एक बनावट व खोटा दस्तऐवज तयार करण्यात आला. या दस्तऐवजावर संतोष उशीर यांची कोणतीही खरी सही किंवा अंगठ्याचा ठसा नसताना, ते स्वतःहून फर्ममधून निवृत्त झाल्याचे भासवण्यात आले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या जागी संशयित मनीषा दत्तात्रय जाधव (शिंदे) या फर्मच्या नवीन भागीदार झाल्याचे कागदोपत्री दर्शवण्यात आले.

बनावट कागदपत्रांच्या जोरावर साडेतीन कोटींचे कर्ज

Advertisement

हा बनावट दस्तऐवज खरा असल्याचे भासवून संशयितांनी पुढील कारस्थान रचले. 'मे. कृषीसाधना महिला शेतमाल उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था' या नावाने अशोका मार्ग येथील इंडसइंड बँकेच्या शाखेत कर्ज प्रकरण सादर करण्यात आले. या कर्जासाठी 'टॉप सेल कॉर्पोरेशन'च्या मालकीची निफाड तालुक्यातील मौजे विंचूर येथील गट नंबर २०५/३ व २०५/४ ही मौल्यवान मिळकत बँकेकडे तारण ठेवण्यात आली. बँकेची दिशाभूल करत संशयितांनी तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले आणि ते परस्पर उचलले. या आर्थिक गैरव्यवहारामुळे फिर्यादी यांची जमीन हडप करण्याचा आणि त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान करण्याचा कट उघडकीस आला.

पाच संशयितांवर गुन्हा दाखल

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतोष उशीर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन कायदेशीर तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी मनीषा दत्तात्रय जाधव (शिंदे), साधना जाधव, दीपक शशिकांत खैरनार, युवराज श्रीपत सोनवणे (सर्व रा. विंचूर, ता. निफाड) आणि मोनीश गोविंदराव देवरे (रा. गोविंदनगर, नाशिक) या पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३३९, ३४०(२) आणि ६१(२) अन्वये फसवणूक, कट रचणे, बनावट दस्तऐवज तयार करणे व त्याचा खऱ्यासारखा वापर करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची नोंद स्टेशन डायरी नंबर २९/२०२६ नुसार करण्यात आली असून, पोलीस हवालदार गायकवाड (ब. नं. ४४६) यांनी गुन्हा दाखल केला. या कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) सागर डगळे करत आहेत. व्यावसायिक वर्तुळात आणि शेतकरी सहकारी संस्थांच्या क्षेत्रात या आर्थिक गैरव्यवहारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

Comments

No comments yet.