'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धा जाहीर... एकूण ५ कोटींची पारितोषिके... तुम्हाला मिळू शकतात १० लाख...

Share:
Main Image
Last updated: 27-Sep-2026

 

मुंबई, (प्रतिनिधी) २७ सप्टेंबर - समाजातील दैनंदिन समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवहार्य आणि लोकाभिमुख उपाय शोधण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ ही बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची अर्ज प्रक्रिया २३ सप्टेंबरपासून सुरू झाली असून १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

४ राज्ये आणि १० मुख्य क्षेत्रांचा समावेश

महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्स, एमएसएमई (MSME), प्राध्यापक आणि सामाजिक संस्थांना या स्पर्धेत भाग घेता येईल. कृषी, कायदा व सुव्यवस्था, महिला व बालकल्याण, नागरी विकास, आरोग्य, संरक्षण, शाश्वत ऊर्जा, पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञान (AI) आणि शिक्षण अशा १० प्रमुख क्षेत्रांतील ५० उपक्षेत्रांमध्ये नवकल्याण सादर करता येणार आहेत.

‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेची मुख्य वैशिष्ट्ये:

५ कोटींची बक्षीसे: १० क्षेत्रांसाठी एकूण ५ कोटी रुपयांची बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत. प्रत्येक क्षेत्रातील ५ विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल.

महिला आणि तरुणांसाठी विशेष श्रेणी: प्रत्येक क्षेत्रात ५ विजेत्यांपैकी एक जागा महिला नवोन्मेषकासाठी आणि एक जागा २१ वर्षांखालील युवा नवोन्मेषकासाठी आरक्षित असेल.

Advertisement

२०० नवकल्पनांचे प्रदर्शन: प्राप्त अर्जांमधून तांत्रिक व प्रभाव मूल्यांकनानंतर अंतिम २०० नवकल्पनांची निवड केली जाईल.

अंतिम सोहळा नागपुरात: स्पर्धेचा अंतिम सोहळा व प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन ७ डिसेंबर २०२६ रोजी नागपूर येथे पार पडेल.

निवड झालेल्या विजेत्यांना केवळ बक्षीस न देता त्यांच्या नवकल्पनांवर आधारित 'पायलट प्रोजेक्ट', शासकीय खरेदी आणि इनक्युबेशनची थेट संधी दिली जाईल, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

लाडक्या बहिणींसाठी २९ सप्टेंबरला विशेष 'रोजगार महाकुंभ'

याचसोबत, महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून २९ सप्टेंबर रोजी एसएनडीटी (SNDT) महिला विद्यापीठ, मुंबई येथे 'रोजगार महाकुंभाचे' आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार असून, 'लाडक्या बहिणीं'साठी आयोजित या विशेष रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद आणि रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

 

Comments

No comments yet.