कोरोगेटेड बॉक्सचे नाशकात भव्य प्रदर्शन... पाच दशकांची गौरवशाली परंपरा आणि आधुनिक संशोधन...

Share:
Main Image
Last updated: 26-Sep-2026

 

मनोहर शिंदे, (नाशिक) २६ सप्टेंबर - वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (WICMA - विक्मा) वतीने आयोजित दोन दिवसीय 'सिम्पॉझियम परिसंवाद २०२६' आणि 'कॉरपेक्स २०२६' या भव्य टेबलटॉप प्रदर्शनाचे नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) अध्यक्ष आशिष नहार आणि राजेंद्र भट्टी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर विक्माचे अध्यक्ष अनिल लोया यांच्यासह पंकज शहा, प्रताप पुराणिक, श्लोक केडिया, आशिष गांधी, सत्यजित पटेल, भरत पारेख, वाय. एम. राव आणि विमल सराफ आदी मान्यवर उपस्थित होते.

पाच दशकांची गौरवशाली परंपरा आणि आधुनिक संशोधन

'विक्मा' ही संस्था गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव या भागातील कोरुगेटेड बॉक्स उत्पादकांचे प्रतिनिधित्व करत आहे. संस्थेच्या संशोधन आणि विकास (R&D) विभागाला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेचा (SIRO) दर्जा प्राप्त असून, NABL मान्यताप्राप्त अत्याधुनिक चाचणी प्रयोगशाळेद्वारे सागरी वाहतुकीसाठी UN प्रमाणपत्र देण्याचे अधिकार संस्थेकडे आहेत. भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत आणि निर्यात क्षेत्रात मजबूत आणि दर्जेदार पॅकेजिंग व्यवस्था उभारण्यासाठी विक्मा सातत्याने मार्गदर्शन करत आहे.

यंदाची संकल्पना : उत्पादकतेचे इंजिन – पेपर, प्रक्रिया व कार्यक्षमता

१२ व्या वर्षात पदार्पण केलेल्या या दोन दिवसीय परिसंवादाची यंदाची संकल्पना "उत्पादकतेचे इंजिन – पेपर • प्रक्रिया • कार्यक्षमता" अशी ठेवण्यात आली आहे. पश्चिम भारतातील उत्पादक, पुरवठादार आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांना एकाच छताखाली आणून कच्च्या मालापासून ते अंतिम बॉक्स उत्पादनापर्यंत कार्यक्षमता कशी वाढवता येईल, यावर सखोल तांत्रिक मंथन सुरू आहे.

१००% पर्यावरणपूरक संकल्पना; झाडांची तोड नाही!

Advertisement

सिंगल-युज प्लास्टिकला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी विक्माने पर्यावरणपूरक कागदी पॅकेजिंगचा जोरदार पुरस्कार केला आहे. या परिसंवादातील खुर्च्या, टेबल, व्यासपीठ, बॅकड्रॉप्स आणि पार्टीशन्स हे सर्व कोरुगेटेड कागदापासून तयार करण्यात आले असून कागदाच्या पाण्याच्या बाटल्यांचाही वापर सुरू आहे.

उद्योजकांनी स्पष्ट केले की, भारतात क्राफ्ट पेपर तयार करण्यासाठी झाडे तोडली जात नाहीत. हा कागद पुनर्वापरित तंतू, जुन्या पिशव्या व बगॅससारख्या कृषी कचऱ्यापासून (बायोमास) तयार होतो, ज्यामुळे हे पॅकेजिंग १०० टक्के पुनर्वापरयोग्य व शाश्वत ठरते. आंबा, द्राक्षे, डाळिंब यांसारख्या शेतीमालाचे शेल्फ लाइफ वाढवून पुरवठा साखळी मजबूत करण्यात हे बॉक्सेस मोलाची भूमिका बजावत आहेत.

एमएसएमई उद्योगांसमोरील आव्हाने आणि जीएसटीची त्रुटी

परिसंवादात उत्पादकांनी उद्योगासमोरील गंभीर आर्थिक अडचणींवर तातडीने लक्ष देण्याची मागणी केली:

 * कच्च्या मालाचे वाढते भाव : गेल्या काही आठवड्यांत कच्च्या मालाचे दर गगनाला भिडल्याने बॉक्स उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत असून खेळत्या भांडवलावर प्रचंड ताण आला आहे.

 * जीएसटीची उलट शुल्क रचना (Inverted Duty Structure) : कच्च्या मालावर जास्त दराने जीएसटी आकारला जातो, तर तयार बॉक्सवर कमी दराने जीएसटी लागतो. यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मोठ्या प्रमाणावर अडकून पडते. परतावा (रिफंड) मिळवण्याची पद्धत अतिशय किचकट असल्याने लहान एमएसएमई (MSME) उद्योजकांचे कोट्यवधी रुपये ब्लॉक झाले आहेत.

शासनाने शुल्काचे दर समान करून ही संरचनात्मक त्रुटी दूर करावी, अशी एकमुखी मागणी उद्योजकांनी केली आहे.

 

Comments

No comments yet.