नाशिक, (प्रतिनिधी) २६ सप्टेंबर - एकीकडे लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांचा आणि उत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, दुसरीकडे शहरात घरफोडीच्या घटनांनी थैमान घातले आहे. वेगवेगळ्या भागांत भरदिवसा घडलेल्या तीन घरफोडीच्या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९ लाख ३४ हजार रुपयांच्या रोकड व दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी अंबड, म्हसरूळ आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१. अंबड पोलीस ठाणे हद्द: वनश्री कॉलनीत रोकडसह सोन्याची पोत लांबवली
अंबड परिसरातील वनश्री कॉलनी, फडोळमळा येथे राहणारे जितेंद्र देवचंद भालेराव यांच्या घरी ही चोरी झाली. भालेराव कुटुंबिय बुधवारी (दि. २३) सकाळी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली १० हजारांची रोकड आणि सोन्याची पोत असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार आहेर या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
२. म्हसरूळ पोलीस ठाणे हद्द: गणेश विसर्जनाच्या दिवशी दिंडोरीरोडवर घरफोडी
दुसरी घटना दिंडोरीरोड परिसरातील कृष्णाकार रो-हाऊस, आकल पेट्रोल पंपामागे, कलानगर येथे घडली. योगेश संपतराव कर्डक हे कुटुंबियांसह शुक्रवारी (दि. २५) दुपारच्या सुमारास गणेश विसर्जनानिमित्त घराबाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडले. बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकूण २ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार बाराईत पुढील तपास करत आहेत.
३. उपनगर पोलीस ठाणे हद्द: गुरुद्वारासमोरील आशिष सोसायटीत ४ लाख ३८ हजारांची चोरी
तिसरी घटना नाशिक-पुणे रोडवरील गुरुद्वारासमोर असलेल्या आशिष सोसायटीत घडली. श्रीकांत दत्तात्रेय टकले हे किरकोळ कामानिमित्त गुरुवारी (दि. २४) सकाळी घराबाहेर पडले असताना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली १ लाख ३० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ४ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक हरिसिंग पावरा या घटनेचा तपास करत आहेत.
सलग घडलेल्या या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.