मुंबई, (प्रतिनिधी) २६ सप्टेंबर - सोने तस्करांच्या नवनवीन शक्कलांचा पर्दाफाश करत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका मोठ्या तस्करीचा आवळलेला पाश उघडकीस आणला आहे. दुबईहून आलेल्या तीन भारतीय प्रवाशांकडून तब्बल १४.८१ कोटी रुपये किमतीचे ९.४० किलो विदेशी सोने जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थांत लपवली सोन्याची पावडर
'डीआरआय'च्या मुंबई पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) आणि सीमाशुल्क विभागाच्या (Customs) मदतीने ही कारवाई करण्यात आली. संशयित प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली असता, सोने लपवण्याची एक अत्याधुनिक पद्धत समोर आली.
तस्करांनी विदेशी सोन्याचे अतिशय बारीक पावडरमध्ये रूपांतर केले होते. हे सोने सहजासहजी ओळखू नये म्हणून दुधाची पावडर, ओट्स, नारळाच्या दुधाची पावडर, विविध प्रकारची पिठे आणि न्युट्रिलासारख्या खाद्यपदार्थांमध्ये ते हुबेहूब मिसळण्यात आले होते. या पॅकेट्सचा रंग, पोत आणि पॅकिंग अगदी सामान्य खाद्यपदार्थांसारखीच ठेवण्यात आली होती.
३३.५० किलो खाद्यपदार्थांतून ९.४० किलो सोने वेगळे
विभागाने प्रवाशांच्या सामानातून सोन्याची पावडर मिसळलेले सुमारे ३३.५० किलो वजनाचे खाद्यपदार्थांचे पाकीट ताब्यात घेतले. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे तपासणी व विलगीकरण करून त्यातून ९.४० किलो शुद्ध सोने मिळवण्यात आले. सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींनुसार हे सोने जप्त करण्यात आले आहे.
संघटित टोळीचा पर्दाफाश
तपासणीदरम्यान अडवण्यात आलेल्या तिन्ही प्रवाशांनी आपण एकाच संघटित सोने तस्कर टोळीसाठी काम करत असल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर सीमाशुल्क कायद्यान्वये तिघांनाही गुरुवारी अटक करण्यात आली.
नियमित तपासणी यंत्रणेला चकवा देण्यासाठी तस्करांनी वापरलेली ही अत्यंत कौशल्याची आणि आधुनिक पद्धत डीआरआयच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली असून, या आंतरराष्ट्रीय टोळीच्या मुळाशी पोहोचण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.