दिवा लावताना कपड्यांनी पेट घेतला... भाजलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू...

Share:
Main Image
Last updated: 26-Sep-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २६ सप्टेंबर - दिवाबत्ती करीत असताना अंगातील कपड्यांनी अचानक पेट घेतल्याने गंभीर भाजलेल्या ७३ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वैशाली विनायक देशपांडे (७३, रा. अथर्व पार्क, वडाळा पाथर्डी रोड, विनयनगर) असे मृत वयोवृद्ध महिलेचे नाव आहे.

घटनेची सविस्तर माहिती:

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली देशपांडे या गत २५ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील देवघरात दिवाबत्ती करीत होत्या. दिवा लावत असताना काहीतरी काढण्यासाठी त्या अचानक उठल्या असता ही दुर्घटना घडली. पेटत्या दिव्यावर कपडे गेल्याने त्यांच्या अंगातील गाऊनने पेट घेतला, ज्यामुळे त्या सुमारे ३५ टक्के गंभीर भाजल्या.

घटना घडल्यानंतर त्यांच्या मुलगा श्रीराम देशपांडे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी अशोका हॉस्पिटल येथे दाखल केले. तिथे गेल्या महिनाभर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. दरम्यान, गुरुवारी (दि. २४) सायंकाळी उपचार सुरू असताना डॉक्टर प्रणित मानकरे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

डॉ. तेजस्विनी पारखे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास हवालदार दीपक गोडे करत आहेत.

 

Comments

No comments yet.