नाशिक, (प्रतिनिधी) २६ सप्टेंबर - शहरात किरकोळ वादातून नागरिकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना सातत्याने समोर येत असून, गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. एकतर्फी प्रेमातून एका सफाई कामगार महिलेला वाहनाने धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर इतर दोन वेगवेगळ्या भागांत झालेल्या हाणामारीत तरुणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहेत. याप्रकरणी मुंबईनाका, अंबड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१. मुंबईनाका पोलीस ठाणे हद्द: एकतर्फी प्रेमातून महिलेस वाहनाची धडक
द्वारका पोलीस चौकीच्या पाठीमागील बाजूस कचरा भरण्याचे काम करणाऱ्या एका सफाई कामगार महिलेचा विजय हरी सावंत (३६, रा. अश्वमेधनगर, पवार मळा, पेठरोड) या संशयिताने पाठलाग करून विनयभंग केला. 'माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, माझ्याबरोबर आली नाही तर जिवंत ठेवणार नाही,' अशी धमकी त्याने दिली. या प्रकारची माहिती पीडित महिलेने आपल्या पतीला सांगितली असता, संशयिताने दांपत्याला शिवीगाळ केली. ही बाब सुपरवायझरला सांगितल्याच्या रागातून संशयिताने महिलेच्या अंगावर मालवाहू वाहन (एमएच १५ केएस ४५५३) घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात महिला जखमी झाली असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक गौतम सुरवाडे या घटनेचा तपास करत आहेत.
२. अंबड पोलीस ठाणे हद्द: सिडकोतील मोरवाडी भागात तरुणावर चाकू हल्ला
सिडकोतील मोरवाडी भागात दुसरा प्रकार घडला. रोशन नवल चव्हाण (२२, रा. सिंहस्थनगर, सिडको) हा तरुण मित्र उमेश सरकटे याच्यासोबत विजयनगर येथून रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पायी घरी जात असताना ही घटना घडली. अकबर शेख, अस्लम शेख व फैजान शेख या संशयितांनी दोन्ही मित्रांची वाट अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घातला. संशयितांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि यातील अस्लम शेख याने उमेश बबन सरकटे याच्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक साळुंखे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
३. देवळाली कॅम्प हद्द: जुनी स्टेशनवाडीत तरुणाला बेल्ट व फायटरने मारहाण
तिसरा प्रकार देवळाली कॅम्पमधील जुनी स्टेशनवाडी भागातील स्मशानभूमीजवळ घडला. समीर संदीप काळे (१७, रा. आंबेडकर सोसायटी, देवळाली कॅम्प) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. काळे व त्याचा मित्र अनिकेत पवार पेट्रोल पंपावर असताना, दंदया उर्फ आशिष राजेश जाधव सोप्या याने वाद मिटवण्याच्या बहाण्याने त्यांना जुनी स्टेशनवाडी येथील स्मशानभूमीत नेले. तेथे संपत वायकर, बोक्या, गौरव गांगुर्डे, प्रेम कनेर व इतर दोन साथीदार उपस्थित होते. 'प्रेम थोरात याच्यासोबत का राहतो?' असे म्हणत संशयितांनी काळे याला कमरेच्या पट्ट्याने, फायटरने आणि कोयता उलटा करून मारहाण केली. तसेच या मारहाणीचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून 'पुन्हा आमच्या नादी लागला तर जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी दिली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक बैसाणे तपास करत आहेत.