मुंबई, (प्रतिनिधी) २६ सप्टेंबर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून 'एनसीएमसी' (NCMC) कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. सवलतीचे तिकीट देताना एनसीएमसी कार्डचा वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, यासाठी कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार आणि बसस्थानकांवर सुरू करण्यात आली आहे.
सवलतीच्या प्रवासाचे डिजिटल व्यवस्थापन: एसटी महामंडळामधून विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते, ज्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांचा समावेश आहे. या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ आणि डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी एनसीएमसी कार्ड प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
नोंदणी आणिQR कोड पावतीची सवलत: १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट केवळ एनसीएमसी कार्डमधूनच वितरीत केले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी यापूर्वी एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे कार्यरत (Active) एनसीएमसी कार्ड किंवा कार्ड नोंदणी केल्याची QR कोड असलेली पावती आहे, त्यांनाच सवलतीचा लाभ मिळणार आहे.
ईटीएम मशीनवर पडताळणी: अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी कार्ड नोंदणी केल्यानंतर मिळालेली QR कोडयुक्त पावती वाहकाच्या ईटीएम मशिनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असून, या कालावधीत प्रवाशांनी कार्ड Active करून त्यात Top-up करणे आवश्यक आहे.
अधिकृत केंद्रांची नियुक्ती आणि टॉप-अप सुविधा: एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची एसटी बसस्थानक व आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेर अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी BHIM App द्वारे Top-up करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली असून, कार्डच्या मागील बाजूस असलेला QR कोड स्कॅन करून टॉप-अप करता येणार आहे.
बायोमेट्रिक अडचणींवर पर्यायी व्यवस्था: आधार कार्डवरील बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभाथ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून, आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTP च्या आधारे एनसीएमसी कार्ड नोंदणी करण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे.
सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने एनसीएमसी कार्ड प्रणाली महत्त्वाची ठरणार असून, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वी कार्ड नोंदणी करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.