मोबाईल ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी... आता रिचार्जचे हे प्लॅन सुद्धा असणार...

Share:
Main Image
Last updated: 25-Sep-2026

 

मुंबई, (प्रतिनिधी) २५ सप्टेंबर - देशातील लाखो मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा देणारा निर्णय भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) घेतला आहे. ट्रायने ‘टेलीकॉम ग्राहक संरक्षण (तेरावी सुधारणा) नियम, २०२६’ जारी केले असून, यानुसार सर्व दूरसंचार कंपन्यांना (Telecommunication Companies) आता फक्त कॉलिंग आणि एसएमएस (Voice Call & SMS) सुविधा असलेले विशेष प्लॅन उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोबाईल डेटाचा (Internet Data) समावेश नसेल.

सामान्य नागरिक अन् ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक फायदा

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश रिचार्ज प्लॅनमध्ये व्हॉइस कॉलिंगसोबत डेटा पॅक घेणे सक्तीचे होते. त्यामुळे ज्या ग्राहकांना इंटरनेटचा वापर करायचा नसतो, त्यांनाही नाहक जास्त पैसे मोजावे लागत होते. विशेषतः साधे (Feature/Keypad) फोन वापरणारे ग्राहक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील जनता आणि ज्यांना फक्त संपर्कासाठी फोन वापरण्याची गरज असते, अशा लाखो ग्राहकांवर आर्थिक भार पडत होता. ट्रायच्या या निर्णयामुळे आता केवळ व्हॉइस आणि एसएमएस सुविधा देणारे प्लॅन अत्यंत रास्त आणि स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.

ट्रायचे स्पष्ट आदेश आणि नियम

ट्रायने जारी केलेल्या नव्या सुधारित नियमांनुसार:

Advertisement

१. प्रत्येक टेलिकॉम कंपनीला (उदा. जिओ, एअरटेल, व्हीआय, बीएसएनएल) आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशा प्लॅनचा समावेश करावा लागेल, ज्यात फक्त कॉलिंग आणि मेसेजची सुविधा असेल.

२. ग्राहकांवर जबरदस्तीने डेटा पॅक लादता येणार नाही.

३. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार स्वतंत्रपणे व्हॉइस/एसएमएस प्लॅन किंवा डेटा प्लॅन निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल.

ग्राहकांची बचत आणि पारदर्शकता

गेल्या काही काळात टेलिकॉम कंपन्यांनी वाढवलेल्या रिचार्ज दरांमुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले होते. इंटरनेट न वापरणाऱ्या ग्राहकांनाही महागडे प्लॅन घ्यावे लागत असल्याची तक्रार सातत्याने ट्रायडे प्राप्त होत होती. या तक्रारींची दखल घेत ट्रायने दूरसंचार क्षेत्रातील या त्रुटींवर बोट ठेवले आहे. नव्या नियमांमुळे ग्राहकांचे पैसे वाचणार असून रिचार्ज प्रक्रियेत अधिक स्पष्टता व पारदर्शकता येईल.

दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ट्रायच्या या निर्णयामुळे मोबाईल सेवा अधिक परवडणारी होईल आणि डेटा न वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. कंपन्या लवकरच हे नवीन आणि स्वस्त रिचार्ज पर्याय बाजारात आणणार आहेत.

 

Comments

No comments yet.