शिर्डी, (प्रतिनिधी) २५ सप्टेंबर - स्वीडनच्या संसदेत (रिक्सडॅग) खासदार म्हणून निवडून येऊन जागतिक पटलावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या नीला विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील आपल्या कौटुंबिक आणि राजकीय वर्तुळाला स्पष्ट संदेश दिला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या राजकीय वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, "गेल्या दशकभरापासून आमचा कोणताही कौटुंबिक अथवा राजकीय संबंध नसताना, माझ्या यशाचे राजकीय भांडवल करून स्वतःची पाठ थोपटून घेणे थांबवावे," अशा कडक शब्दांत त्यांनी आपल्याच काका आणि चुलत भावाला सुनावले आहे.
‘महाराष्ट्रात खासदारकी गेली तरी स्वीडनमध्ये मिळाली’ वक्तव्यावर आक्षेप
नीला विखे पाटील यांची स्टॉकहोम शहरातून 'ग्रीन पार्टी'च्या उमेदवार म्हणून स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या रिक्सडॅग (संसद) मध्ये निवड झाली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून त्यांचे कौतुक झाले; मात्र, भाजप नेते डॉ. सुजय विखे पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. या व्हिडिओमध्ये सुजय विखे यांनी, "महाराष्ट्रात खासदारकी गेली तरी आमच्या घराण्याला स्वीडनमध्ये खासदार मिळाला," असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत नीला यांनी आपल्या यशाचा राजकीय फायदा उचलण्याच्या प्रयत्नांवर थेट आक्षेप नोंदवला आहे.
१० वर्षांहून अधिक काळ संबंध नाही
आपल्या भावना स्पष्ट करताना नीला यांनी कौटुंबिक वास्तव समोर मांडले. त्या म्हणाल्या, "काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ सुजय यांच्याशी माझा गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून कोणताही संपर्क झालेला नाही. विजयानंतर केवळ एक औपचारिकता म्हणून शुभेच्छांचा फोन येणे ही वेगळी गोष्ट आहे; परंतु त्या शुभेच्छांचा वापर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि प्रतिमेसाठी करणे अत्यंत चुकीचे आहे. माझ्या मेहनतीचे श्रेय इतरांनी स्वतःकडे घेऊ नये."
विचारसरणीत जमीन-अस्मानाचा फरक
महाराष्ट्रातील विखे पाटलांचे राजकारण आणि आपली राजकीय भूमिका यातील फरक अधोरेखित करताना नीला यांनी थेट विचारसरणीवर बोट ठेवले. "माझी आणि नगरच्या विखे कुटुंबीयांची राजकीय विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. मी ज्या तत्त्वांवर आणि मूल्यांवर राजकारण करते, तिथेच ठाम राहीन. मी कधीही माझा पक्ष बदलणार नाही," असे स्पष्ट करत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पक्षांतराच्या इतिहासावर अप्रत्यक्ष टाच आणली. राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असा केलेला राजकीय प्रवास जगजाहीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोण आहेत नीला विखे पाटील?
नीला या अहमदनगरमधील ज्येष्ठ नेते स्व. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. नीला यांचा जन्म स्वीडनमध्येच झाला असून, त्यांच्या बालपणातील काही वर्षे अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या मूळ गावी गेली. त्यानंतर उच्च शिक्षण आणि राजकीय कारकिर्दीसाठी त्या स्वीडनमध्ये स्थायिक झाल्या.
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी स्वीडनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. हरित राजकारण, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक समता या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. आता स्वीडनच्या संसदेत पोहोचल्यानंतर त्यांनी घेतलेल्या या आक्रमक आणि स्पष्ट भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि विशेषतः नगर जिल्ह्यात मोठ्या चर्चेला उधाण आले आहे.