नाशिक, (प्रतिनिधी) २५ सप्टेंबर - आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांना तात्काळ व प्रभावी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महाकाय आरोग्य नियोजन आखले आहे. केवळ रुग्णालयांवर अवलंबून न राहता, भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणीच वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी २६० कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आरोग्य आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या नियोजनाअंतर्गत १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारण्यात येणार असून, पर्वणीच्या काळात १९० रुग्णवाहिका आणि ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे, अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
गर्दीच्या ठिकाणी १३६ तात्पुरती पोर्टा-कॅबिन रुग्णालये
साधुग्राम, पार्किंग क्षेत्र, घाट, होल्डिंग व स्टेजिंग एरिया आणि प्रमुख मार्गांवर १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा (दवाखाने व आयसीयू) पोर्टा-कॅबिन स्वरूपात उभारल्या जातील. यामुळे प्राथमिक उपचार आणि किरकोळ आजारांवरील उपचारांसाठी भाविकांना मुख्य रुग्णालयांपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही.
अत्याधुनिक रुग्णवाहिका आणि ३,६०० कर्मचाऱ्यांचा ताफा
१९० रुग्णवाहिका: आणीबाणीच्या प्रसंगी जलद वाहतुकीसाठी 'अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट' (ALS) आणि 'बेसिक लाइफ Support' (BLS) प्रकारच्या १९० रुग्णवाहिका तैनात असतील. यामध्ये खरेदी केलेल्या वाहनांचा समावेश असून, कुंभमेळ्यानंतरही त्या सार्वजनिक आरोग्य सेवेत वापरल्या जातील.
अतिरिक्त मनुष्यबळ: वाढीव सेवेसाठी ३,६०० अतिरिक्त डॉक्टर (MBBS, BAMS, तज्ज्ञ), परिचारिका, एएनएम, फार्मासिस्ट व तंत्रज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांना गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन उपचारांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
खाटांची संख्या १,९४५ वर; आयसीयू क्षमतेत मोठी वाढ
सिंहस्थादरम्यान रुग्णालयांची एकूण क्षमता १,३०५ वरून १,९४५ खाटांपर्यंत वाढवली जाणार आहे. यामध्ये १८५ आयसीयू (ICU) खाटांचा समावेश असेल.
विशेषतः महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय आणि आरोग्यशाळा रुग्णालय या चार प्रमुख रुग्णालयांमधील आयसीयू खाटांची क्षमता १७ वरून थेट ९० खाटांवर, तर एकूण क्षमता ३५० वरून ५५० खाटांवर नेली जात आहे.
डिजिटल ट्रॅकिंग आणि पोर्टेबल मेडिकल युनिट्स
साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'डिजिटल रोग निरीक्षण यंत्रणा' (Digital Disease Surveillance) कार्यरत केली जाईल. तसेच रुग्णवाहिकांसाठी GPS ट्रॅकिंग आणि गरजेच्या ठिकाणी तात्काळ हलवता येणारी ३ पोर्टेबल आपत्कालीन वैद्यकीय युनिट्स (Portable Emergency Medical Units) देखील तैनात केली जाणार आहेत. या सर्व व्यवस्थेचे नियोजन अतिरिक्त कुंभमेळा आयुक्त प्रमोद पवार आणि त्यांचे पथक करत आहे.