नाशिक, (प्रतिनिधी) २५ सप्टेंबर - शेतजमीन खरेदीचा दस्त नोंदणी करून देण्यासाठी वकिलाकडे लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारताना दुय्यम निबंधक वर्ग-२ आणि त्याच्या साथीदार खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. ही धडक कारवाई २४ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ४ मध्ये करण्यात आली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईत प्रमोद लक्ष्मण वामन (वय ५७ वर्षे, पद- दुय्यम निबंधक वर्ग-२, दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ४, नाशिक; रा. रिद्धिसिद्धी अपार्टमेंट, लोकमान्य नगर, नाशिकरोड) आणि खाजगी इसम योगेश बाळू डांगले (वय ३८ वर्षे, रा. पिंपळास रामाचे, ता. निफाड, जि. नाशिक) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
दस्त नोंदणीसाठी १० हजारांची लाच मागितली
या प्रकरणातील तक्रारदार हे ३८ वर्षीय वकील आहेत. त्यांच्या एका पक्षकाराच्या शेतजमीन खरेदीचा दस्त नोंदणी करण्याचे काम दुय्यम निबंधक कार्यालयात प्रलंबित होते. सदर दस्त नोंदणी करून देण्यासाठी दुय्यम निबंधक प्रमोद वामन यांनी तक्रारदार वकिलाकडून १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकारामुळे तक्रारदार यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (नाशिक) गाठून लेखी तक्रार नोंदवली.
तडजोडीअंती ४,२०० रुपयांवर सहमती आणि सापळा
प्राप्त तक्रारीची पडताळणी २४ सप्टेंबर रोजी दुपारी ४:२३ ते ५:२० या वेळेत पंचांसमक्ष करण्यात आली. या पडताळणीदरम्यान दुय्यम निबंधक प्रमोद वामन यांनी स्वतःसाठी व खाजगी इसम योगेश डांगले याच्यासाठी सुरुवातीला मागितलेल्या १० हजार रुपयांच्या रकमेत तडजोड करून ती ५,००० रुपये आणि पुन्हा तडजोडअंती ४,२०० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच खाजगी इसम योगेश डांगले यानेही वामन यांच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवून लाच मागणीस प्रोत्साहन दिले.
त्यानंतर लगेचच एसीबी पथकाने दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ४ मध्ये सापळा रचला. तक्रारदाराने लाचेची रक्कम दिली असता, दुय्यम निबंधक प्रमोद वामन यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम योगेश डांगले याने ४,२०० रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही पंचांसमक्ष ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल आणि कायदेशीर कारवाई
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७(अ) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, गुन्हा नोंद झाल्यानंतर दोघांनाही अधिकृतपणे अटक करण्यात येईल, असे विभागातर्फे सांगण्यात आले.
सदर यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विकास शिवाजी लोंढे यांनी काम पाहिले. त्यांना पर्यवेक्षक अधिकारी स्वप्नील राजपूत (पोलीस निरीक्षक/वाचक), पोलीस हवालदार प्रभाकर गवळी, पोलीस अंमलदार किरण धुळे, सुरेश चव्हाण आणि नितीन नेटारे यांनी सहकार्य केले.
शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२५७५६२८ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ९९३०९९७७०० वर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी नाशिक परिक्षेत्राकडून करण्यात आले आहे.