नाशिक, (प्रतिनिधी) २४ सप्टेंबर - महाराष्ट्राच्या वैभवाचा पाठीचा कणा असलेल्या सह्याद्री पर्वतरांगा, तेथील ऐतिहासिक किल्ले आणि समृद्ध नैसर्गिक पर्यटन स्थळांच्या सुरक्षेसाठी व शाश्वत विकासासाठी नाशिकमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. शहरातील अग्रणी 'वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थे'च्या ४१व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी 'सह्याद्री संवाद : राज्यस्तरीय गिर्यारोहण, सुरक्षा आणि शाश्वत पर्यटन परिषद' चे आयोजन करण्यात आले आहे.
गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य संकुल (कुर्तकोटी सभागृह) येथे सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:३० या वेळेत ही परिषद पार पडेल. या परिषदेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सह्याद्रीच्या रक्षणासाठी थेट जमिनीवर काम करणारे गिर्यारोहक, स्थानिक प्रशासन, पोलिस दल, पुरातत्व विभाग आणि पर्यटन विभागाचे सर्व महत्त्वाचे उच्चपदस्थ अधिकारी एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.
शासनाला सादर होणार 'सजग गिरीभ्रमण' मसुदा
अलीकडच्या काळात सह्याद्रीच्या कडेकपारीत पर्यटकांची वाढती गर्दी, प्लॅस्टिकचे प्रदूषण, ऐतिहासिक वास्तूंची विटंबना आणि धबधबे किंवा आव्हानात्मक ठिकाणी होणारे दुर्दैवी अपघात ही गंभीर चिंता बनली आहे. या पार्श्वभूमीवर, या परिषदेत होणाऱ्या विचारमंथनातून "सजग गिरीभ्रमण" (Mindful Trekking and Tourism) विषयी ठोस सूचना आणि उपायांचा एक अधिकृत मसुदा तयार केला जाईल. हा मसुदा राज्य शासनाला पुढील धोरणात्मक निर्णयांसाठी सादर करण्यात येणार आहे.
परिषदेतील प्रमुख विचारमंथन व उद्दिष्टे:
सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन: दुर्गम भागात पर्यटनादरम्यान होणारे अपघात टाळणे, पाण्याच्या ठिकाणी (धबधबे, नद्या, धरणे) सुरक्षेच्या उपाययोजना करणे आणि संकटसमयी त्वरित 'शोध व बचाव' (Search & Rescue) यंत्रणा सक्रिय करण्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करणे.
ऐतिहासिक व पर्यावरण संवर्धन: पुरातत्व आणि वनविभागाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत किल्ले, प्राचीन अवशेष आणि निसर्गरम्य संवेदनशील क्षेत्रांचे जतन करणे.
स्थानिक रोजगार निर्मिती: गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या ग्रामपंचायतींना सोबत घेऊन पर्यटनाला शिस्तबद्ध स्वरूप देणे आणि स्थानिक गावकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
प्रमाणित कार्यपद्धती (SOPs) सक्ती: ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी शिस्त, सुरक्षेचे नियम व मार्गदर्शक तत्त्वांची कडक नियमावली निश्चित करणे.
दिग्गजांची उपस्थिती
या परिषदेत पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक विकास पानसरे, नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS), नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी (IPS), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे आणि साल्हेर (कळमुस्ते) चे सरपंच अशोक बुरंगे यांसारखे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
वैनतेय संस्थेचे प्रशांत राजाराम परदेशी, राहुल सोनवणे, डॉ. ज्ञानेश्वर गुंजाळ, मनोज बाग आणि राजेश नागरे यांनी सह्याद्रीप्रेमी, गिर्यारोहक व पर्यटकांना या परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.