नाशिक, (प्रतिनिधी) २४ सप्टेंबर - शेतातील वीज जोडणीवरील कारवाई टाळण्यासाठी व नवीन मीटर बसवण्याच्या कामात अडथळा न आणण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. तर कारवाईची चाहूल लागताच मुख्य आरोपी असलेला महावितरणचा वायरमन घटनास्थळावरून पसार झाला आहे. ही कारवाई २४ सप्टेंबर २०२६ रोजी पिंपळगाव बसवंत हद्दीत करण्यात आली.
या प्रकरणी महावितरणचा वर्ग-३ कर्मचारी जितेंद्र ठाकूर (वय- व्यवसाय नोकरी, वायरमन कार्यालय महावितरण विभाग, वडाळीभुई, ता. चांदवड; रा. भंडारी ग्रीन सोसायटी, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक) आणि खाजगी इसम कृष्णा काशिनाथ ढोमसे (वय ३० वर्षे, व्यवसाय- मेडिकल शॉप, रा. गोरठाण, शिरवाडे वणी, ता. निफाड, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व ७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाईची भीती घालून लाचेची मागणी
तक्रारदार यांचे वडाळीभुई (ता. चांदवड) येथे शेत आहे. शेती व्यवसायासाठी त्यांनी शेतातील ट्रान्सफॉर्मरमधून वायरद्वारे वीज घेतली होती. ऑगस्ट २०२६ मध्ये वायरमन जितेंद्र ठाकूर याने तक्रारदारांना अनधिकृत विजेवर कारवाई करण्याची भीती दाखवून १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदाराने भीतीपोटी ठाकूर याला १० हजार रुपये दिले होते.
यानंतर २४ सप्टेंबर रोजी आरोपी ठाकूर याने तक्रारदाराच्या भावाला संपर्क करून उर्वरित राहिलेले ५ हजार रुपये देण्याचा निरोप दिला. हे उर्वरित पैसे दिले नाहीत, तर शेतात नवीन मीटर बसवण्याचे काम व कोटेशनच्या प्रक्रियेत खोडा घालून काम अडवून ठेवेल, अशी खात्री तक्रारदाराला पटल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (नाशिक) कडे धाव घेत तक्रार नोंदवली.
सापळा रचून कारवाई; खाजगी इसम जाळ्यात, वायरमन पसार
प्राप्त तक्रारीची २३ सप्टेंबर २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पिंपळगाव बसवंत परिसरात सापळा रचला.
तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन आले असता, वायरमन जितेंद्र ठाकूर याने ती रक्कम आरोपी कृष्णा ढोमसे (मेडिकल चालक) याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार कृष्णा ढोमसे याने ५०० रुपयांच्या १० नोटा म्हणजेच एकूण ५,००० रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. मात्र, सापळा कारवाईची चाहूल लागताच वायरमन जितेंद्र ठाकूर घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी लाचेची रक्कम जप्त केली असून खाजगी इसम कृष्णा ढोमसे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
तपास पथक व आवाहन
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी यांनी काम पाहिले, तर त्यांच्या पथकात पंकज पळशिकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके व योगेश साळवे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी करत आहेत.
कोणत्याही शासकीय कामासाठी अथवा लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा ०२५३-२५७५६२८ वर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आले आहे.