प्रलंबित जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी... कागदपत्रे आता अशी जमा करा...

Share:
Main Image
Last updated: 24-Sep-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २४ सप्टेंबर - ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी, नीट (NEET), यूजी आणि जेईई (JEE) परीक्षा दिलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) पडताळणीसाठी नाशिक जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अर्जदार स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी योगेश पाटील यांनी दिली.

ई-मेलद्वारे पाठवलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक कार्यालयाकडे अनेक अर्जदारांची प्रकरणे केवळ त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत. अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर CCVIS-II प्रणालीद्वारे या त्रुटींबाबत आधीच कळविण्यात आले आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप या त्रुटींची पूर्तता केलेली नाही. विद्यार्थ्यांच्या आगामी शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत जात वैधता प्रमाणपत्रामुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ही विशेष कार्यवाही केली जात आहे.

कागदपत्रे जमा करण्यासाठी प्रक्रिया:

Advertisement

कालावधी: संबंधित अर्जदारांनी २४ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आपल्या ई-मेलवर प्राप्त झालेल्या त्रुटींची पूर्तता करावी.

कागदपत्रे जमा करणे: त्रुटींशी संबंधित मूळ कागदपत्रे शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून हस्ते पोहोच (Hand Delivery) देऊन जमा करावीत.

ऑनलाइन व नागरी सुविधा केंद्र: प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने त्रुटी अपलोड केल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे समिती कार्यालयांतर्गत असलेल्या नागरी सुविधा केंद्रात जमा करावीत.

मध्यस्थांपासून सावध राहण्याचा इशारा

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार पार पडत आहे. त्यामुळे कोणत्याही अर्जदाराने अथवा पालकाने कोणत्याही मध्यस्थाशी (Agent) संपर्क साधू नये तसेच कोणाच्याही आमिषाला अथवा आश्वासनाला बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अडचणींसाठी विद्यार्थ्यांनी थेट समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

Comments

No comments yet.