मुंबई, (प्रतिनिधी) २४ सप्टेंबर - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि एकंदरीत कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या एका राष्ट्रीय वृत्तपत्राच्या वृत्ताचा हवाला देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात इतर दोन निवडणूक आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचे समोर आल्यानंतर, राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
'मॅच फिक्सिंग'चा आरोप आणि 'सजग' आयुक्तांचे अभिनंदन
आपल्या सडेतोड निवेदनात राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुकांच्या वेळी राज्यातील विरोधी पक्ष सातत्याने मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांच्या सहकाऱ्यांवर अविश्वास दाखवत होते. राज्य निवडणूक आयोग आणि स्थानिक अधिकाऱ्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवून निर्णय दिल्लीतून लादले जात होते. आमचे हे आरोप आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत. निवडणूक आयोग स्वायत्त उरलेला नसून तो सत्ताधाऱ्यांच्या अधीन झाला आहे.”
निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी पाठीचा कणा ताठ ठेवून ऑन-रेकॉर्ड आक्षेप नोंदवल्याबद्दल राज ठाकरेंनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, अशा धाडसी अधिकाऱ्यांमुळेच व्यवस्थेतील त्रुटी समोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मतदार याद्यांमधील फेरफारांवर गंभीर बोट
वृत्तपत्रातील माहितीचा संदर्भ देत राज ठाकरेंनी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले:
अधिकार डावलून आदेश: मतदार नोंदणी, नावे वगळणे आणि सॉफ्टवेअरशी संबंधित महत्त्वाचे आदेश इतर आयुक्तांच्या मंजुरीशिवाय काढण्यात आले.
'फॉर्म ६' मधील बेकायदेशीर प्रश्न: कायद्यात बदल न करता अर्जदारांच्या कौटुंबिक माहितीबाबत परस्पर नियम लादले गेले.
स्थानिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण: स्थानिक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांचे (ERO) अधिकार काढून घेऊन संगणकीय सॉफ्टवेअरच्या माध्यमातून निर्णय प्रक्रियेवर ताबा मिळवण्यात आला.
अपात्रतेचा गोंधळ: गोव्यात स्थानिक अधिकाऱ्यांनी ९७ जणांना पात्र ठरवूनही सॉफ्टवेअरच्या त्रुटींमुळे त्यांची नावे अंतिम यादीत आली नाहीत. तसेच पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही अधिकारांशिवाय लाखो अपील्स दाखल केली गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरसाठी जनआंदोलनाचे आवाहन
बिहार, आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील निवडणुकांचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, “निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार याद्यांत फेरफार करून निवडणुका जिंकण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पहिला लढा निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात आहे आणि आता दुसरा टप्पा ईव्हीएम (EVM) विरोधात असला पाहिजे.” सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारावे, असे आवाहन त्यांनी सर्व विरोधी पक्षांना केले.
"सभेतील गर्दीची मतं कोण चोरतं, याचे उत्तर मिळाले!"
आपल्या निवेदनाच्या शेवटी राजकीय विरोधक आणि पत्रकारांवर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले, “मनसेच्या सभांना अथांग गर्दी होते, मग ती मते कुठे जातात? असा प्रश्न विचारणाऱ्या भाजपधार्जिण्या पत्रकारांना आज उत्तर मिळाले असेल. आमची मते कोण चोरत होते आणि त्यांना कोणाची मदत मिळत होती, हे आता स्पष्ट झाले आहे.”
मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आणि या संपूर्ण प्रकरणामागे असलेल्या सूत्राधारांची चौकशी झाल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही, असा इशारा देत स्वायत्त निवडणूक आयोग हेच लोकशाहीचे अंतिम सत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.