गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझरवर पूर्णपणे बंदी... जिल्हा प्रशासनाचे कडक आदेश जारी...

Share:
Main Image
Last updated: 24-Sep-2026

 

मनोहर शिंदे, (नाशिक) २४ सप्टेंबर - सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकांदरम्यान नागरिकांच्या डोळ्यांची सुरक्षा आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, या संदर्भातील प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी जारी केले आहेत. हे निर्बंध २५ सप्टेंबर २०२६ (अनंत चतुर्दशी) पासून ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहेत.

सुमारे २६०३ सार्वजनिक मंडळांचे विसर्जन; प्रशासनाकडून दक्षता

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. ग्रामीण भागात सुमारे २,६०३ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळांच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपासून ते २८ सप्टेंबरपर्यंत विसर्जन मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे.

विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडाव्यात, यासाठी ग्रामीण पोलिसांमार्फत ठाणे स्तरावर गणेश मंडळे, डीजे तसेच साऊंड सिस्टीम मालक आणि चालकांच्या एकूण ४० समन्वय बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये ध्वनीप्रदूषणाची मर्यादा पाळणे, वाहतुकीस अडथळा न करणे, विसर्जनावेळी आवश्यक ती काळजी घेणे आणि लेझर बीमचा वापर टाळणे याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.

आरोग्यास धोका आणि कायद्याची तरतूद

Advertisement

मागील काही वर्षांत सण-उत्सवांमधील विसर्जन मिरवणुकांमध्ये शक्तिशाली लेझर दिव्यांचा अतिवापर वाढल्याचे दिसून आले आहे. अशा तीव्र लेझर किरणांमुळे मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले व वृद्धांच्या डोळ्यांच्या दृष्टीपटलास (रेटिना) कायमस्वरूपी इजा पोहोचण्याचा आणि दृष्टी कमी होण्याचा गंभीर धोका उद्भवू शकतो.

या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (BNSS) चे कलम १६३ मधील तरतुदींनुसार हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा

प्रशासनाने दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान कोणत्याही विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. जर कोणी या आदेशाचे उल्लंघन करून लेझर लाईटचा वापर करताना आढळल्यास, संबंधित व्यक्ती, संस्था, गणेश मंडळ पदाधिकारी अथवा साऊंड सिस्टीम चालक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम २२३ व इतर प्रचलित कायद्यांनुसार कायदेशीर व दंडनीय कारवाई करण्यात येईल.

सर्व उपविभागीय दंडाधिकारी, पोलीस प्रशासन आणि कार्यकारी दंडाधिकारी यांना या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नागरिकांनी व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून उत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Comments

No comments yet.