सरसकट पंचनामे करून तालुका टंचाईग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाला अहवाल सादर करा.... माजी खासदार समीर भुजबळ यांची सूचना

Share:
Main Image
Last updated: 23-Sep-2026

 

येवला, (प्रतिनिधी) २३ सप्टेंबर - पावसाने तब्बल ४६ दिवसांपासून ओढ दिल्याने येवला तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगामातील पिके संकटात सापडली असून, अनेक गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज ममदापूर, राजापूर परिसरातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त मका, सोयाबीन, बाजरी यासह विविध खरीप पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. शेतकऱ्यांनी यावेळी पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे झालेल्या नुकसानीची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांना दिली. तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आणि आगामी रब्बी हंगामासाठी निर्माण होणाऱ्या अडचणींबाबतही शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना “दुष्काळग्रस्त भागातील एकही शेत पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. दोन दिवसांत सर्व सरसगट नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर करावा अशा सूचना दिल्या.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, गेल्या ४६ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. मका, सोयाबीन, बाजरीसह विविध खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पंचनामे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळ न दवडता तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करावा.

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागातील पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार येवला तालुक्यातील सरसगट पंचनाम्यांची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पावसाने ओढ दिल्यामुळे केवळ खरीप हंगामच अडचणीत आलेला नाही, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. येवला तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई निर्माण होत असल्याने आगामी काळात आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येईल. पूर्व भागातील गरजू गावांमध्ये आठवडाभरात पाण्याचे टँकर सुरू करण्याबाबत प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच पावसाअभावी आगामी रब्बी हंगामातील पिकांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी सध्याचे निकष पुरेसे ठरत नसतील तर त्यामध्ये आवश्यक बदल करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल. तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा केला जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत  असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ हे देखील लवकरच येवला तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करणार असून, शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेऊन शासनस्तरावर आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

यावेळी तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, मच्छिंद्र थोरात, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, नितीन गायकवाड, दीपक गायकवाड, सुनील पैठणकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Comments

No comments yet.