मुंबई, (प्रतिनिधी) २३ सप्टेंबर - आयआयटी मुंबईतील वीस वर्षांचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर उठलेल्या वादावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दुःखद घटनेचे मूळ कारण शिक्षण व्यवस्थेतील वाढता ताण आणि नैराश्य हे असताना, या संपूर्ण प्रकरणाला जातीय वळण देऊन मूळ मुद्द्याला बगल दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
'जात' हा मुद्दा आणून मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष
राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका मांडताना सांगितले की, "परीक्षेत गैरप्रकार रोखणे हे प्राध्यापकांचे कर्तव्य आहे, मात्र आरोप सिद्ध होण्यापूर्वी मृत विद्यार्थ्याला गुन्हेगार ठरवणे चुकीचे होते. तसेच, चौकशी पूर्ण होण्याआधी प्राध्यापकांना दोषी धरणेही अयोग्य आहे. दुर्दैवाने या प्रकरणात 'जात' हा मुद्दा पुढे आणून एका वीस वर्षांच्या तरुणाला आपले आयुष्य संपवावेसे का वाटले, यावर कोणीच बोलायला तयार नाही." सन २००० नंतर महाराष्ट्रात जातीचे विष इतके फोफावले आहे की, ते आता पंडित नेहरूंनी 'आधुनिक भारताची मंदिरे' म्हटलेल्या आयआयटीसारख्या संस्थांपर्यंत पोहोचले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
जीवघेणी स्पर्धा आणि शैक्षणिक नैराश्य
सध्याची शिक्षण व्यवस्था अत्यंत ताणतणावाची झाली असल्याचे नमूद करत राज ठाकरे म्हणाले, "काही शंभर जागांसाठी लाखो मुले परीक्षा देतात. निवडीनंतर अभ्यासाचे ओझे आणि त्यानंतर कॅम्पस सिलेक्शनमध्ये मिळणाऱ्या पगाराची चिंता, यामुळे विद्यार्थी नैराश्यात जात आहेत. हे नैराश्य केवळ आयआयटीपुरते मर्यादित नसून आर्ट्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय शाखेच्या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे. गेल्या ३०-४० वर्षांत शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे पूर्ण व्यवस्थेचे अपरिमित नुकसान झाले आहे."
विद्यार्थ्यांना आंदोलनाची योग्य दिशा ठेवण्याचे आवाहन
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, चोवीस तास सायकिऍट्रिस्ट (मानसोपचारतज्ज्ञ), कौन्सिलिंग व्यवस्था, तक्रार निवारणातील पारदर्शकता आणि शिस्तभंगाची कारवाई करताना विद्यार्थी खचणार नाही अशी यंत्रणा उभी करणे, या मागण्या अत्यंत रास्त आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आंदोलनाची दिशा हीच ठेवली पाहिजे. जर या आंदोलनात जात किंवा धर्म आणला, तर विषय भरकटवणे सोपे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यवस्थेतील दोष दुरुस्त करण्यासाठीच सरकारला धारेवर धरावे, असे आवाहन त्यांनी केले.