नाशिक, (प्रतिनिधी) २३ सप्टेंबर - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सोवानंतरही राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील दळणवळणाचा प्रश्न किती गंभीर आहे, याचा विदारक प्रत्यय नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा एकदा आला आहे. रस्ता आणि पुलासारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे एका २२ वर्षांच्या गंभीर आजारी तरुणाला चक्क 'डोली'तून भर उफाळणारी पार नदी पार करून उपचारासाठी शेजारच्या गुजरात राज्यात न्यावे लागले. या क्लेशदायक घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था आणि रस्ते विकासाच्या दाव्यांची पोलखोल झाली असून स्थानिक प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
सुरगाणा तालुक्यातील खिर्डी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या खिरपाडा-वांगणपाडा परिसरातील नागरिकांना आजही दैनंदिन प्रवासासाठी आणि उपचारासाठी निसर्गाच्या भयंकर संकटांचा सामना करावा लागत आहे. गावाजवळून वाहणाऱ्या पार नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात किंवा नदीला पाणी असताना हा परिसर मुख्य प्रवाहापासून तुटतो.
काय आहे नेमकी घटना?
खिरपाडा येथील भास्कर पांडू तुरे (वय २२) हे गेल्या चार-पाच दिवसांपासून तीव्र तापाने आणि आजाराने फणफणले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना तातडीने उपचाराची गरज होती. गावात वैद्यकीय सुविधा नसल्याने त्यांना जवळच्या बाऱ्हे येथील ग्रामीण रुग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र, गावाकडे येणारा रस्ता अत्यंत खडकाळ, चिखलमय आणि वाईट अवस्थेत असल्याने कोणतीही रुग्णवाहिका किंवा खासगी वाहनचालक गावात येण्यास तयार झाला नाही.
५ किलोमीटरची धोकादायक पायपीट
महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा कामी न आल्याने आणि बाऱ्हेचा रस्ता बंद असल्याने ग्रामस्थांसमोर अखेरचा पर्याय उरला तो म्हणजे शेजारच्या गुजरात राज्याचा. खिरपाडा गावाला लागूनच गुजरातची हद्द असून तेथील 'माणी' येथील रुग्णालय तुलनेने जवळ आहे. मात्र, तेथे जाण्यासाठी पार नदी ओलांडणे भाग होते.
भास्कर यांची बिघडत चाललेली प्रकृती पाहून ग्रामस्थांनी लाकडी बांबूला झोळी (डोली) बांधली आणि रुग्णाला त्यात झोपवले. पांडू तुरे, बाळू तुरे, रमेश इजल, प्रभू इजल, लशी निंबारे, पांडू राठड आणि रुग्णाच्या आईने जीवाची पर्वा न करता रुग्णाला डोलीत उचलून घेतले. नदीकाठचा निसरडा, खडकाळ मार्ग आणि पाण्याचा प्रवाही वेग यांचा सामना करत त्यांनी नदी पार केली. यानंतर तब्बल ५ किलोमीटरची अंतराची पायपीट करत रुग्णाला गुजरातच्या माणी येथील रुग्णालयात दाखल केले.
प्रशासकीय दाव्यांवर फुसका बार
डिजिटल इंडिया आणि रस्ते विकासाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना, नाशिकसारख्या प्रगत जिल्ह्याच्या दुर्गम भागात आजही नागरिकांना उपचारासाठी 'डोली'चा वापर करावा लागतो, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी आदिवासी विकास योजनेअंतर्गत मंजूर होतो, मग पार नदीवर पूल आणि पक्का रस्ता का बनत नाही? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी विचारला आहे.
वेळेवर उपचार न मिळाल्यास कोणाचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण? असा थेट प्रश्न आता सुरगाण्यातील नागरिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला विचारत आहेत.