नाशिकचा १६ वर्षीय आर्यन शुक्ला जगप्रसिद्ध 'ह्युमन कॅल्क्युलेटर'... ९ गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्ससह जगातील नंबर १...

Share:
Main Image
Last updated: 22-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ सप्टेंबर - अवघा १६ वर्षांचा विद्यार्थी आर्यन शुक्ला याने आपल्या अलौकिक आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर गणिताच्या जगतात भारताचा झेंडा जगभरात उंचवला आहे. जगातील सर्वोच्च 'ह्युमन कॅल्क्युलेटर' (मानवी गणकयंत्र) म्हणून नावारूपाला आलेल्या आर्यनने आत्तापर्यंत तब्बल ९ गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि २ मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप (२०२२ व २०२४) ची विजेतेपदे आपल्या नावावर केली आहेत.

६ जुलै २०१० रोजी नाशिकमध्ये जन्मलेला आणि दिल्ली पब्लिक स्कूलचा (DPS) विद्यार्थी असलेला आर्यन आज जगातील आघाडीच्या गणितज्ज्ञांमध्ये गणला जातो.

६ वर्षांचा असताना लागलेला शोध, ८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदके

आर्यनचे वडील नितीन शुक्ला (व्या व्यावसायिक) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनला वयाच्या सहाव्या वर्षी गणितातील आकड्यांमध्ये विशेष रस असल्याचे लक्षात आले. अवघ्या ६ ते ८ महिन्यांच्या सरावानंतर त्याने वयापेक्षा अत्यंत कठीण गणिते तोंडी सोडवण्यास सुरुवात केली.

२०१८ (इस्तंबूल): अवघ्या ८ वर्षांचा असताना तुर्कस्तानमधील 'मेमोरियाड ओपन चॅम्पियनशिप'मध्ये त्याने १० पैकी ७ सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला.

२०२२ (जर्मनी): १२ व्या वर्षी 'मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप'मध्ये जगातील ४० दिग्गज आणि अनुभवी गणितज्ज्ञांना पराभूत करून तो सर्वात तरुण जागतिक विजेता बनला.

२०२४ (जर्मनी): २०२४ च्या वर्ल्ड कपमध्ये उपलब्ध असलेली सर्व ६ ची ६ चषक जिंकून ८१९.८४ गुणांसह आपल्या जेतेपदाचे रक्षण केले.

एकाच दिवसात ६ गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स

Advertisement

डिझेंबर २०२४ मध्ये दुबईतील गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मुख्य कार्यालयात आर्यनला निमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्याने एकाच दिवसात ६ नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केले.

यामध्ये ५० पाच-अंकी संख्यांची अवघ्या १८.७१ सेकंदात तोंडी बेरीज करणे आणि दोन पाच-अंकी संख्यांचा ५१.६९ सेकंदात गुणाकार करणे यांसारख्या अद्भूत विक्रमांचा समावेश आहे. असा पराक्रम करणारा तो भारताचा एकमेव तरुण ठरला आहे. याआधी फेब्रुवारी २०२४ मध्ये इटलीतील 'लो शो देई रेकॉर्ड' या टीव्ही शोदरम्यान त्याने पहिला वैयक्तिक गिनेस रेकॉर्ड केला होता.

"आम्ही गणिताचे तज्ज्ञ नाही, हा आर्यनचा सराव व निष्ठा": नितीन शुक्ला

आपल्या मुलाच्या या यशावर बोलताना वडील नितीन शुक्ला म्हणाले, "आमचे कुटुंब अत्यंत सामान्य आहे. मी व्यावसायिक आहे आणि आर्यनची आई मीनल शुक्ला या आधी आयटी क्षेत्रात कार्यरत होत्या. आमच्या कुटुंबात आधी कुणीही मेंटल कॅल्क्युलेटर नव्हते. आर्यनची ही प्रतिभा अब्जात एखाद्याकडेच असते, परंतु ही केवळ निसर्गाची देणगी नसून त्याची कठोर मेहनत आणि रोजचा सराव याच्या जोरावर त्याने हे स्थान मिळवले आहे."

जागतिक व्यासपीठावर नाशिकचे नाव उज्ज्वल

आर्यनला फुटबॉल, क्रिकेट खेळायला आणि पुस्तके वाचायला आवडतात. त्याच्या या कौशल्यामुळे त्याला रशियातील 'द अमेजिंग पीपल' शो, रियाधमधील 'मिस्क ग्लोबल फोरम', तसेच न्यूयॉर्कच्या नॅशनल म्युझियम ऑफ मॅथेमॅटिक्सच्या ऑनलाइन सत्रांमध्ये निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय, सीएनएन-न्यूज१८ च्या 'रायझिंग भारत समिट २०२५' मध्ये त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठ सामायिक करण्याची संधीही मिळाली होती.

आजच्या काळात जिथे लहान मुलांची स्मरणशक्ती आणि गणितातील आवड कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे, तिथे नाशिकच्या या १६ वर्षांच्या मुलाने कठोर परिश्रम, शिस्त आणि कौशल्याच्या बळावर जग जिंकून दाखवले आहे.

?s=20

Comments

No comments yet.