मनोहर शिंदे, (नाशिक) २२ सप्टेंबर - राज्यातील तब्बल १९ जिल्ह्यांमध्ये पावसाने दिलेल्या मोठ्या ओढीमुळे आणि अतिखंडामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. येत्या २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे नियोजित असलेले पक्षाचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबीर अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेतला. राज्यात सध्या पावसाअभावी उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि पीक-पाण्यासह चाऱ्याच्या टंचाईचा आढावा घेतला जात असून शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.
अशा संवेदनशील आणि कठीण प्रसंगात राजकीय सोहळे किंवा शिबिरे आयोजित न करता, बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही पक्षाची प्राथमिक जबाबदारी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले. राज्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच सदरचे राज्यव्यापी शिबीर पुन्हा आयोजित केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, पक्षाचे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनासोबत समन्वयाने काम करावे, तसेच तातडीने उपाययोजना राबवण्यावर भर द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आहे.