फावड्याने वार करून पत्नीची हत्या... नराधम पतीला नाशिक कोर्टाने दिली ही शिक्षा...

Share:
Main Image
Last updated: 22-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ सप्टेंबर - कौटुंबिक वादाच्या जुन्या कुरापतीतून स्वतःच्या पत्नीच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी फावड्याने सपासप वार करून तिची अत्यंत निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला नाशिकच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची अद्दल घडवली आहे. नाशिक तालुक्यातील मांडसांगवी (माळवाडी) येथील रहिवासी असलेल्या विशाल राजाराम कापसे (वय ३०) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला जन्मठेपेसह २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखी ३ महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. तर पुराव्याअभावी या खटल्यातील इतर चार सहआरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

नेमकी काय होती घटना?

ही भीषण घटना १६ मे २०२२ रोजी रात्री सुमारे ११:०० वाजेच्या सुमारास नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आडगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली होती. माळवाडी (मांडसांगवी) येथील रहिवासी असलेला आरोपी विशाल कापसे याचे त्याची पत्नी आरती कापसे हिच्याशी कौटुंबिक कारणांवरून जुने वाद सुरू होते. घटनेच्या दिवशी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून आरतीसोबत जुन्या वादाची कुरापत काढत तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर भीषण हिंसाचारात झाले. संतापाच्या भरात पती विशाल कापसे याने घराजवळ पडलेला लोखंडी फावडा उचलून थेट आरतीच्या तोंडावर व डोक्यावर प्राणघातक वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात आरती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलीस तपास आणि न्यायालयात दोषारोपपत्र:

Advertisement

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात विशाल कापसे याच्यासह अन्य चार नातेवाईकांवर भादंवि कलम ३०२ (खून) आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी या संवेदनशील गुन्ह्याचा अत्यंत सखोल आणि चिकाटीने तपास केला. घटनास्थळावरून जप्त केलेले पुरावे, पंचनामे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून त्यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सबळ दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले.

न्यायालयाचा अंतिम निकाल:

सदर खटल्याची (सत्र खटला क्र. ३९२/२०२२) सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल एन. रोकडे यांच्या न्यायालयात पार पडली. सरकारी पक्षाने सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने मुख्य आरोपी विशाल कापसे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सबळ पुराव्यांअभावी खटल्यातील आरोपी क्र. २ ते ५ (सुरेश कापसे, निवृत्ती कापसे, शोभा उर्फ अलका कापसे आणि बंटी कापसे) यांची न्यायालयाने सुटका केली.

प्रभावी युक्तिवाद आणि तपास पथकाचे अभिनंदन:

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. अभियोग कक्षाचे प्रभारी कोर्ट अधिकारी (पो. उपनिरीक्षक) जयवंत गुळवे आणि आडगाव पोलीस ठाण्याच्या पैरवी अंमलदार महिला पोलीस हवालदार संगीता बहिरम यांनी खटल्यात सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

गुन्हा सिद्ध करून आरोपीला कडक शिक्षा मिळवून दिल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ-१ च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख (पंचवटी विभाग), सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके (गुन्हे शाखा) आणि आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी तपास पथकाचे व पैरवी अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

Comments

No comments yet.