नवापूर, (प्रतिनिधी) २२ सप्टेंबर - मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार होऊ न देता प्रकरण आपापसात मिटवून देण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागून, त्यातील उर्वरित ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना बिलमांजरे येथील पोलीस पाटील आणि त्याच्या एका खासगी साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही धडक कारवाई सोमवारी, २१ सप्टेंबर २०२६ रोजी नवापूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ करण्यात आली.
गिरीश नान्या मावची (वय ५२, नेमणूक- पोलीस पाटील, रा. बिलमांजरे, ता. नवापूर) आणि कांतीलाल रुळजी गावीत (वय ४८, खासगी इसम, रा. आमपाडा, ता. नवापूर) अशी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदारांचा (वय ४८) मुलगा एका सायबर कॅफेमध्ये कामाला आहे. तेथे एका २३ वर्षीय महिलेची कामाच्या निमित्ताने त्यांच्या मुलाशी ओळख झाली होती. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यात फोन आणि मेसेजद्वारे संभाषण सुरू होते. ही बाब महिलेच्या पतीला समजल्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाले.
महिलेच्या पतीने बिलमांजरे गावचा पोलीस पाटील गिरीश मावची याला तक्रारदाराच्या मुलावर पोलिसांत तक्रार करायची असल्याचे सांगितले. हीच संधी साधून पोलीस पाटील गिरीश मावची आणि त्याचा साथीदार कांतीलाल गावीत यांनी मुलावर कोणतीही पोलीस कारवाई होऊ न देता प्रकरण आपापसात मिटवून देण्याच्या नावाखाली तक्रारदाराकडे तब्बल ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध:
मागितलेल्या ७० हजार रुपयांपैकी ३० हजार रुपये आरोपींनी २९ ऑगस्ट २०२६ रोजीच तक्रारदाराकडून उकळले होते. उर्वरित ४० हजार रुपयांसाठी आरोपी वारंवार तगादा लावत असल्याने तक्रारदाराने १५ सप्टेंबर २०२६ रोजी एसीबी नंदुरबार कार्यालयाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता, दोघा संशयितांनी कारवाई टाळण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सापळा:
पडताळणीनंतर २१ सप्टेंबर २०२६ रोजी नंदुरबार एसीबीच्या पथकाने नवापूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सापळा रचला. तक्रारदाराकडून पोलीस पाटील गिरीश मावची याने साथीदार कांतीलाल गावीत याच्या उपस्थितीत ४० हजार रुपयांची रोकड स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने दोघांना पंचांसमक्ष रंगेहात पकडले.
याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
कारवाई करणारे पथक:
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अप्पर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच अंमलदार विलास पाटील, विजय ठाकरे, संदीप खंडारे, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले आणि हेमंतकुमार महाले यांनी केली.