गणेश विसर्जनासाठी नाशिक जिल्ह्यात नवी नियमावली... जिल्हाधिकाऱ्यांनी यावर घातली बंदी...

Share:
Main Image
Last updated: 21-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ सप्टेंबर - गणेशोत्सव विसर्जनादरम्यान जिल्ह्यातील नद्या, तलाव, खदानी आणि जलाशयांमध्ये बुडून होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत (जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक) विसर्जन सोहळा सुरक्षित आणि आपत्तीमुक्त पार पाडण्यासाठी अत्यंत कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना व मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. २१ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) रोहितकुमार राजपूत यांनी हे अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत.

मागील काही वर्षांचा अनुभव पाहता विसर्जनाच्या वेळी भाविकांना पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने, अतिउत्साहामुळे तसेच गर्दीमुळे बुडून मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून सर्व तहसीलदार, नगरपालिका/नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, पोलीस विभाग, अग्निशमन दल आणि जलसंपदा विभागाला तातडीने प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रमुख विभागांना देण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्देश

१. तहसीलदार (महसूल विभाग):

 * तालुक्यातील सर्व अधिकृत आणि अनधिकृत विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक ठिकाणांची स्वतंत्र यादी तातडीने तयार करावी.

 * संबंधित यंत्रणेमार्फत प्रत्येक विसर्जन घाटावर पाण्याच्या खोलीबाबत स्पष्ट दर्शक फलक (Depth Indication Board) आणि धोक्याच्या सूचना मराठी भाषेत ठळकपणे लावाव्यात.

 * संवेदनशील ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक स्वयंसेवक आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांची नियुक्ती करावी.

२. मुख्याधिकारी (नगरपालिका / नगरपरिषद):

 * आपल्या कार्यक्षेत्रातील कृत्रिम विसर्जन कुंडांची संख्या वाढवावी तसेच त्यांची स्वच्छता आणि पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी.

 * सर्व विसर्जन घाटांवर सुरक्षित बॅरिकेडिंग करून भाविकांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करावेत.

 * घाटांवर लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, मजबूत दोरखंड, स्ट्रेचर आणि प्रथमोपचार पेटी (First Aid Box) सज्ज ठेवावी.

 * ध्वनिक्षेपकावरून (लाऊडस्पीकर) नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतत जनजागृतीपर सूचना प्रसारित कराव्यात.

३. पोलीस विभाग:

 * प्रत्येक विसर्जन स्थळावर पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि महिला पोलिसांची विशेष पथके तैनात ठेवावीत.

 * गर्दी आणि वाहतुकीचे काटेकोर नियोजन करावे; तसेच मद्यपान करून विसर्जनासाठी येणाऱ्या समाजकंटकांवर कठोर प्रतिबंध घालावा.

Advertisement

 * रात्रीच्या वेळी विसर्जनासाठी निघणाऱ्या गणेश मंडळांसाठी विशेष गस्त (पेट्रोलिंग) ठेवावी.

 * भाविक आणि नागरिक खोल पाण्यात किंवा प्रतिबंधित क्षेत्रात जाणार नाहीत, यावर कडक पहारा ठेवावा.

४. अग्निशमन विभाग (Fire Brigade):

 * सर्व मोठ्या आणि गर्दीच्या विसर्जन घाटांवर शोध व बचाव पथक (Search & Rescue Team), रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट्स आणि प्रशिक्षित पाणबुडे/पोहणाऱ्यांसह सुसज्ज ठेवावे.

 * इतर प्रशासकीय यंत्रणांशी चोवीस तास समन्वय ठेवून आपत्कालीन परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवावे.

५. जलसंपदा विभाग:

 * कालवे, धरणे, बंधारे व जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात संभाव्य धोकादायक ठिकाणी धोक्याचे फलक, खोली दर्शक फलक व बॅरिकेड्स उभारावेत.

 * पोलीस व महसूल विभागाशी समन्वय ठेवून धरणांच्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्त ठेवावी.

नागरिक आणि भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना

 * भाविकांनी व नागरिकांनी अतिउत्साहात कोणत्याही परिस्थितीत खोल पाण्यात उतरू नये.

 * विसर्जनाच्या वेळी लहान मुले आणि महिलांना पाण्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवावे.

 * धरणे, खदानींचे साचलेले पाणी, धोकादायक बंधारे अशा प्रतिबंधित जलाशयांच्या ठिकाणी जाणे पूर्णपणे टाळावे.

 * बुडून होणारे मृत्यू, विजेचे अपघात अथवा कोणत्याही अनुचित दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.

 * विसर्जन मार्गावरील धोकादायक व अनधिकृत होर्डिंग्स, पोस्टर्सवर स्थानिक प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि पर्यावरणपूरक कृत्रिम कुंडांचा वापर करून लाडक्या बाप्पाला सुरक्षित निरोप द्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे. आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ०२५३-२३१५०८० किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधता येईल.

Comments

No comments yet.