नाशिक 'एअरो शो' ची अशी आहे जय्यत तयारी... जिल्हाधिकारीच फिल्डवर...

Share:
Main Image
Last updated: 18-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ जानेवारी - भारतीय वायू दल आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 22 व 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत गंगापूर धरण येथे होणाऱ्या एरो शो करिता नाशिकसह इतरही ठिकाणच्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत अनेकांनी शो पाहण्यासाठी आपापल्या जागा निश्चित केल्या आहेत. नागरिकांनी आपली जागा आजच निश्चित करून शो चा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

नाशिक शहरातच नव्हे, तर राज्यात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची जय्यत तयारी गेल्या 15 दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी प्रसाद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी गंगापूर धरण परिसरास भेट देऊन आतापर्यंत झालेल्या तयारीचा आढावा घेत आहेत. 

पोलिस दलाने वाहतुकीचे नियोजन केले, तर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दर दिवशी 35 हजार नागरिकांच्या बैठक व्यवस्थेसह वाहनतळ आदींचे नियोजन करण्यात येत आहे, तर जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग पाणी, स्वच्छतेचे नियोजन करीत आहे. वायू दलाचे वरिष्ठ अधिकारी नाशिक येथे दाखल झाले असून त्यांच्याकडून तयारीचा आढावा घेण्यात येत आहे.

या सर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, या शो च्या माध्यमातून नाशिककरांना हवाई प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक नाशिककर नागरिकाने आजच आपली जागा निश्चित करून घ्यावी. त्यासाठी गंगापूर धरण परिसरात बैठक व्यवस्थेला वायू दलातील लढाऊ विमानांची नावे देण्यात आली आहेत. तसेच या शोसाठी मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे. त्याचे ही नियोजन पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे नाशिककरांनी आजच आपली जागा निश्चित करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.