गणेश विसर्जन सोहळा सुरक्षित, सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे... आमदार पंकज भुजबळ यांच्या सूचना

Share:
Main Image
Last updated: 21-Sep-2026

येवला, (प्रतिनिधी) २१ सप्टेंबर - भाविकांना विसर्जनासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करावे. विसर्जन सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडण्यासाठी घाट परिसरातील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सुरक्षिततेच्या उपाययोजना, भाविकांची ये-जा, गर्दीचे नियोजन तसेच आवश्यक सुविधा करण्यात याव्यात असे निर्देश आमदार पंकज भुजबळ संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंगणगाव, येवला येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तसेच बोटिंग क्लब परिसराची आमदार पंकज भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विसर्जन सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या प्रशासकीय तयारीचा सविस्तर आढावा घेतला. गणेशमूर्ती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.

घाट परिसरात स्वच्छता नियमितपणे राखण्याबरोबरच विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे, आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवणे तसेच भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Advertisement

अहिल्यादेवी होळकर घाटालगत असलेल्या बोटिंग क्लब परिसराचीही आमदार पंकज भुजबळ यांनी पाहणी केली. परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता, प्रकाश व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. बोटिंग क्लब परिसर नागरिकांसाठी सुरक्षित व व्यवस्थित राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

गणेशोत्सव हा श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. विसर्जन सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित आणि सुकर वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची हलगर्जी न करता नियोजनबद्ध पद्धतीने काम करून विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पूर्णपणे सज्ज राहावे, असे आमदार पंकज भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet.