मेरठ, (प्रतिनिधी) २१ सप्टेंबर - भारतीय हवाई दलाच्या (IAF) प्रसिद्ध 'सूर्यकिरण एरोबॅटिक चमुने' (SKAT) १९ आणि २० सप्टेंबर २०२६ रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे प्रथमच सादर केलेल्या अभूतपूर्व हवाई प्रात्यक्षिकाने प्रेक्षकांना थक्क केले. दोन दिवस रंगलेल्या या नेत्रदीपक सोहळ्याला विद्यार्थी, एनसीसी (NCC) छात्र, एनएसएस (NSS) स्वयंसेवकांसह १ लाखांहून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावत हवाई दलाच्या शौर्याचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे, या पथकातील हवाई कसरती सादर करणाऱ्या दोन वैमानिकांसह तीन सदस्य हे थेट मेरठचेच रहिवासी असल्याने स्थानिकांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद ठरला.
२० सप्टेंबर रोजी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी या प्रात्यक्षिकाचा थरार प्रत्यक्ष अनुभवला. हा सोहळा शिस्त, अचूकता, सांघिक कार्य आणि भारतीय हवाई दलाच्या गौरवशाली क्षमतांचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी 'एक्स'वर (ट्विटर) पथकाच्या धैर्याचे कौतुक केले. याशिवाय, पहिल्याच दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही तिरंग्याच्या रंगांनी आकाश रंगवणाऱ्या वैमानिकांच्या कौशल्याची प्रशंसा करत हा देश अन् राज्यासाठी प्रेरणादायी क्षण असल्याचे नमूद केले. या प्रसंगी राज्यसभा खासदार डॉ. लक्ष्मीकांत बाजपेयी, राज्यमंत्री सोमेंद्र तोमर, आमदार अश्विनी त्यागी आणि धर्मेंद्र भारद्वाज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अतिशय धोकादायक कसरती अन् 'नाशिक कनेक्शन'
'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड'ने (HAL) निर्मित केलेल्या ९ 'हॉक एमके १३२' विमानांद्वारे पथकाने लूप, बॅरल रोल, उलटे उड्डाण आणि प्रसिद्ध 'डीएनए' कसरती सादर केल्या. ही विमाने आकाशात अवघ्या ५ मीटरपेक्षा कमी अंतरावरून एकमेकांच्या शेजारी उड्डाण करत होती.
या प्रात्यक्षिकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विमानांमधून सोडण्यात येणारा रंगीत धूर! नाशिक येथील भारतीय हवाई दलाच्या 'बेस रिपेअर डेपो'ने स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे या विमानांमध्ये विशेष 'स्मोक पॉड्स' बसवले आहेत. या बदलामुळे वैमानिकांना आकाशात राष्ट्रध्वजाचे भगवे, पांढरे आणि हिरवे रंग अत्यंत हुबेहूब साकारता आले.
'हवाई दलाचे राजदूत' सूर्यकिरण पथक
१९९६ मध्ये स्थापन झालेले सूर्यकिरण पथक हे आशियातील एकमेव ९ विमानांचे आणि जगातील निवडक एरोबॅटिक पथकांपैकी एक आहे. गेल्या ३० वर्षांत भारतात आणि परदेशात (श्रीलंका, म्यानमार, सिंगापूर, यूएई इत्यादी) ८०० हून अधिक प्रात्यक्षिके सादर करून या पथकाने भारतीय हवाई दलाची व्यावसायिकता जगभरात पोहोचवली आहे. तरुणांना संरक्षण दलात भरती होण्यासाठी प्रेरित करणे हे या पथकाचे मुख्य उद्दिष्ट आहे.