नागपुरात २५० एकर जागेवर होणार हा भव्य प्रकल्प... ५, हजार जणांना मिळणार रोजगार...

Share:
Main Image
Last updated: 21-Sep-2026

नागपूर, (प्रतिनिधी) २१ सप्टेंबर - "देशातील सर्वात मोठी सोलर मॉडेल इकोसिस्टीम नागपूर येथे आकार घेत असून येत्या १० वर्षांत नागपूर हे 'सोलर इकोसिस्टीम'चे प्रमुख हब बनेल. त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील अवादा समूहाच्या प्रकल्पाला भेट देऊन सोलर मॉडेल निर्मितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

अवादा समूहाचे संस्थापक व अध्यक्ष विनीत मित्तल यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि मुंबईच्या भविष्यातील बदलांवर उद्योजकांशी विस्तृत संवाद साधला.

पाहणी दौरा व मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे मुद्दे:

अवादा समूहाचा विस्तार व २५० एकर जागा: अवादा हा सोलर मॉडेल बनवणारा सर्वात मोठा सुपर उद्योग असून ॲडव्हान्स इंटिग्रेशनमुळे येथे स्मार्ट मॉड्युलची निर्मिती होत आहे. भूमीपूजनानंतर वेगाने पूर्ण झालेल्या या प्रकल्पात आज ५ हजार कामगार कार्यरत आहेत. या प्रकल्पाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेली २५० एकर जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

नवी बुटीबोरी व वर्ध्यात भूसंपादन: अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रातील जागा संपल्याने आता तिसरी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहत उभारली जाणार आहे. तसेच वर्धा जिल्ह्यातही नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन सुरू आहे.

उद्योगांना २०२९ पर्यंत स्वस्त वीज: स्टील उद्योगांना प्रोत्साहन दिले जात असून, सोलर बॅटरी स्टोरेजच्या माध्यमातून २४ तास ऊर्जा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०२९ पर्यंत उद्योगांना अत्यंत स्वस्त वीज उपलब्ध करून दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

गडचिरोली नवीन 'स्टील सिटी': गडचिरोलीत ४ लाख कोटींची गुंतवणूक आली असून बेल्जियमच्या कंपनीसोबत 'ग्रीन स्टील' निर्मितीचा सामंजस्य करार झाला आहे.

वाढवण बंदर अन् लॉजिस्टिक खर्चात ६०% बचत: समृद्धी महामार्ग आणि येत्या ३ वर्षांत पूर्ण होणारे वाढवण ग्रीन पोर्ट जगात पहिल्या १० बंदरांमध्ये समाविष्ट होईल. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमुळे लॉजिस्टिक खर्चात तब्बल ६० टक्क्यांनी घट होऊन विकासाला मोठी गती मिळेल.

मुंबई १० वर्षांत 'झोपडपट्टीमुक्त' होणार: समूह विकासाच्या (Group Development) धोरणाअंतर्गत पर्यायी घर किंवा ३ वर्षांचे भाडे दिले जात असल्याने मुंबई येत्या १० वर्षांत पूर्णपणे झोपडपट्टीमुक्त होईल.

मुंबईचा कोस्टल रोड अन् वाहतूक कोंडीतून मुक्ती: वांद्रे-वर्सोवा मार्ग २०२८ पर्यंत, तर वर्सोवा-भाईंदर नॉर्थ कोस्टल रोड मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होईल. तसेच वेस्टर्न एक्सप्रेसला सिग्नल-फ्री समांतर मार्ग आणि बोगद्यामुळे २३ किमीचा प्रवास १.५ तासांऐवजी अवघ्या १५ ते १७ मिनिटांत पूर्ण होईल.

नवीन नागपूरच्या प्रकल्पात ५० टक्क्यांहून अधिक जागा अधिकृत झाली असून स्मार्ट इंडस्ट्रीसाठी ही इकोसिस्टीम अत्यंत मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

?s=20

Comments

No comments yet.