नाशिक, (प्रतिनिधी) २१ सप्टेंबर - नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. नीलेश जेजुरकर याच्या अटकेनंतर, आता या प्रकरणातील मुख्य संशयित मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्वाती चव्हाण हिला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आज (२१ सप्टेंबर) डॉ. चव्हाण यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
६ मार्च २०२६ रोजी गंगापूर रोड परिसरातील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये डॉ. मनीषा जेजुरकर (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ. मनीषा यांची बहीण रोहिणी थोरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती डॉ. नीलेश जेजुरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद
आज डॉ. स्वाती चव्हाण यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला तीव्र विरोध दर्शवला. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, "डॉ. चव्हाण यांनी आतापर्यंत ९ वेळा पोलिसांसमोर उपस्थित राहून तपासात पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांनी आपले स्टेटमेंट्स नोंदवले असून पोलिसांनी फोटो आणि आवश्यक माहितीही घेतली आहे. जर दोन्ही आरोपींमध्ये प्रेमसंबंध होते हे एकवेळ मान्य केले, तरी मृत व्यक्तीला काय त्रास दिला किंवा अन्य काय केले, याचा वेगळा तपास पोलीस कस्टडी घेऊन काय करणार? त्यामुळे पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी (MCR) देण्यात यावी."
मात्र, सरकारी पक्षाने आणि पोलिसांच्या वकिलांनी या युक्तिवादाला कडाडून विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाने पती डॉ. नीलेश जेजुरकरचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. त्या चौकशीतून मिळालेले धागेदोरे आणि समन्स बजावूनही डॉ. स्वाती चव्हाण यांनी टाळाटाळ केल्याचे सांगत, या षड्यंत्राचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडी अत्यंत आवश्यक असल्याचे न्यायालयाने मान्य केले.
मानसिक छळ आणि विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप
तक्रारीनुसार, २०२१ पासून डॉ. नीलेश हा पत्नीकडे दुर्लक्ष करून डॉ. स्वाती चव्हाण यांच्या सल्ल्याने वागत होता. जानेवारी २०२६ मध्ये डॉ. स्वाती हिने डॉ. मनीषा यांना फोन करून "तुझ्या नवऱ्याला तू अजिबात आवडत नाहीस, तुझ्या बुद्धीची पातळी अत्यंत कमी आहे" अशा शब्दांत हिणवून प्रचंड मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या सततच्या छळाला कंटाळूनच डॉ. मनीषा यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.
तपासाची चक्रे अधिक वेगाने
मृत्यूच्या वेळची परिस्थिती, मोबाईल कॉल डिटेल्स (CDR), डिजिटल पुरावे आणि शवविच्छेदन अहवालाबाबत तक्रारदारांच्या वकिलांनी उपस्थित केलेले संशय लक्षात घेता, नाशिक गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक आता दोन्ही आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी करणार आहे. यामुळे या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.