नाशिक, (प्रतिनिधी) २१ सप्टेंबर - नाशिक औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरातील एका खासगी कंपनीचे छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत तांब्याची वायर व इतर साहित्याची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार विक्रेत्याला गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेला १ लाख ५० हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
कंपनीचे पत्रे उचकटून केली होती घरफोडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:०० ते १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने एमआयडीसी परिसरातील 'विशाल इलेक्ट्रो इंडस्ट्रिज प्रा.लि.' या कंपनीला लक्ष्य केले होते. चोरट्याने कंपनीच्या मागील बाजूचे छताचे पत्रे कशाच्या तरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. तेथून कॉपर वायरचे रोल, कॉपरची टेफ्लॉन वायर आणि कॉपरचे विविध सुटे भाग चोरून नेले होते. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (ड), ३३१ (३) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा (गु.र.नं. १८०/२०२६) दाखल करण्यात आला होता.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आरोपीस बेड्या
पोलीस आयुक्तालय हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना, विशेष पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर आणि पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. रेकॉर्डवरील गुन्हेगार आदित्य पांडे यानेच विशाल इलेक्ट्रो इंडस्ट्रीज कंपनीत चोरी केल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, युनिट-२ चे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. चुंचाळे शिवार, घरकुल योजना, अंबड येथून आदित्य देवानंद पांडे (वय २५ वर्षे, रा. संविधान चौक, बिल्डिंग नं. ०८, घरकुल योजना, चुंचाळे, अंबड, नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले.
भंगार विक्रेत्याकडून १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसी खाक्या दाखवताच संशयित आरोपी आदित्य पांडे याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेला तांब्याचा माल मुंबई-आग्रा महामार्गालगत भंगाराचे दुकान चालवणाऱ्या राजमन रामजस चौधरी (वय ४२ वर्षे, मूळ रा. पचारीकला, पो. खम्बा, ता. रुधौली, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राजमन चौधरी यालाही ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरीस गेलेला एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईनंतर दोन्ही आरोपींना जप्त साहित्यासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कामगिरी करणारे पथक
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण तसेच पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, तेजस मते आणि जितेंद्र वजीरे यांच्या पथकाने केली.