एकाच छताखाली ११ दाखले... पाच प्रमुख शासकीय योजनांचा थेट लाभ... राज्य सरकारची विशेष मोहीम...

Share:
Main Image
Last updated: 21-Sep-2026

अक्षय काळे, (मुंबई) २१ सप्टेंबर - राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ आणि आवश्यक दाखले सहजतेने उपलब्ध व्हावेत, यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून २७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ दरम्यान राज्यभरात विशेष "भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान" राबवण्यात येणार आहे.

Advertisement

शासनाच्या 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' अभियानांतर्गत ही विशेष मोहीम राबवली जात असून, महसूल विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंडळ व तालुका स्तरावर वस्तीनिहाय शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे. या विशेष तीन दिवशीय अभियानानंतर, दर तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी हे अभियान नियमितपणे राबवले जाईल.

एकाच छताखाली मिळणार सर्व दाखले व योजनांचे लाभ

या तीन दिवसांच्या विशेष शिबीरांमध्ये नागरिकांना खालील आवश्यक प्रमाणपत्रे व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील:
आवश्यक दाखले व ओळखपत्रे: आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमीलेयर, रहिवास दाखला, आयुष्मान भारत कार्ड, विवाह नोंदणी आणि दिव्यांग प्रमाणपत्रे.
शासकीय योजनांचे थेट लाभ: श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशासनाचा होणार गौरव

प्रशासकीय यंत्रणेने या अभियानापूर्वीच वस्तीनिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, अशा स्पष्ट सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा, तालुका आणि नगरपालिका प्रशासनाचा राज्य शासनाकडून विशेष गौरव करण्यात येणार आहे.

Comments

No comments yet.