शेतापर्यंतचा रस्ता होणार सुखकर... शेत व पाणंद रस्त्यांसाठी सुरू झाला हा उपक्रम... मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ...

Share:
Main Image
Last updated: 21-Sep-2026

अक्षय काळे, (मुंबई) २१ सप्टेंबर - राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीपर्यंत बारमाही आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व भूमी अभिलेख विभागातर्फे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्तेयोजना – शेत सेतू: महापाणंद गतीशक्ती’ हे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. या योजनेअंतर्गत राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे आधुनिक डिजिटल मॅपिंग करून संपूर्ण राज्यात ‘महापाणंद ग्रिड’ उभारली जाणार आहे.

‘सेवा संकल्प अभियान’ आणि प्रमुख वैशिष्ट्ये

कालावधी: राज्यातील सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या एका महिन्याच्या कालावधीत ही विशेष मोहीम राबवली जाईल.

४ लाख रस्त्यांचे डिजिटल नेटवर्क: राज्यातील सुमारे ४ लाख शेत रस्त्यांची माहिती उपग्रह प्रतिमांच्या साहाय्याने 'इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम' (IWMS) मध्ये समाविष्ट केली असून हे भौगोलिक स्थान सार्वजनिक पोर्टलवर उपलब्ध असेल.

अद्ययावत पारदर्शक प्रणाली: प्रस्तावापासून ते ई-बिलिंगपर्यंतच्या सर्व टप्प्यांचे व्यवस्थापन एकाच डिजिटल प्रणालीद्वारे पारदर्शकपणे केले जाईल.

Advertisement

ग्रामपंचायतींचे उद्दिष्ट: २८ हजार ग्रामपंचायतींमधून तब्बल ५० हजार रस्ते या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी विशेष मोबाईल ॲप

या मोहिमेदरम्यान शेतकरी तक्रार व अभिप्राय मोबाईल ॲपचेही अनावरण करण्यात आले. याद्वारे शेतकरी शेतरस्त्यांवरील अतिक्रमाणांबाबत किंवा समस्यांबाबत फोटो, व्हिडिओ आणि जीपीएस लोकेशनसह थेट तक्रारी नोंदवू शकतील.

सेवा सप्ताहातील उपक्रम

सेवा सप्ताहादरम्यान ग्रामसभांचे आयोजन, प्राधान्यक्रमाच्या रस्त्यांची निवड, रस्त्यांचे विनाशुल्क सीमांकन आणि अतिक्रमणमुक्तीची मोहीम राबवण्यात येणार आहे. शेतमाल, खते आणि कृषी यंत्रसामग्री शेतापर्यंत विनाअडथळा पोहोचवून शेतकऱ्यांचे दळणवळण सुलभ करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Comments

No comments yet.