मनोहर शिंदे, (नाशिक) २१ सप्टेंबर - नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आयोजित होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याचा ध्वजारोहण कार्यक्रम ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी विकासकामांची गुणवत्ता राखत ही कामे अत्यंत गतीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी शहरातील रामकुंड परिसर, रामकालपथ आणि घाटांच्या निर्माण व दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर पत्रकारांशी व अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी कामांच्या दर्जाबाबत आणि वेळेबाबत विशेष सूचना दिल्या.
महत्त्वाच्या कामांसाठी ३ आठवड्यांची मुदत
ध्वजारोहण सोहळ्याबाबत माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, "३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध आखाड्यांचे साधू-संत व महांतांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी हा भव्यदिव्य सोहळा पार पडेल. सोहळ्यास सुमारे ४० दिवसांचा कालावधी शिल्लक असला, तरी रामकुंड परिसरातील नवीन घाट, कुंड निर्मिती, सांडपाणी व्यवस्थापन व इतर अनुषंगिक कामे आगामी ३ आठवड्यांत पूर्ण झाली पाहिजेत." तसेच ध्वजारोहणानंतर होणाऱ्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार
राज्यातील हवामान आणि पीक परिस्थितीवर बोलताना पालकमंत्री महाजन म्हणाले की, राज्यात सध्या दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेती पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून, पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली जाईल.
वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, सहआयुक्त प्रदीप चौधरी, पंचवटी प्रभाग समिती सभापती रोहिणी पिंगळे, शहर अभियंता संजय अग्रवाल, पुरोहित संघाचे पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह व मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा पालकमंत्र्यांसमोर सादर केला.