खासगी ट्रॅव्हल्सला तगडी टक्कर... एसटीच्या ताफ्यात दाखल होणार या २०० अत्याधुनिक बसेस...

Share:
Main Image
Last updated: 21-Sep-2026

अक्षय काळे, (मुंबई) २१ सप्टेंबर - महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने (MSRTC) आता लांब पल्ल्याच्या आणि आरामदायी प्रवासी सेवेमध्ये नवा अध्याय सुरू केला आहे. खासगी आराम बससेवेकडे (Private Travels) वळणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच व्होल्वो बसेसचा समावेश होत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

दिवसा आरामदायी बैठक व्यवस्था, रात्री स्लीपर सुविधा

२५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या ५ ते ६ तासांच्या दिवसाच्या प्रवासासाठी ४५ आसनी (Push-back Seating) आरामदायी बसेस, तर रात्रीच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ क्षमतेच्या शयनयान (Sleeper) बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. प्रवाशांच्या गरजेनुसार दिवस व रात्रीच्या प्रवासासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असणार आहेत.

खासगी बुकिंग ॲप्सवरूनही तिकीट उपलब्ध होणार

नव्या व्होल्वो बससेवेचे डिजिटल बुकिंग अधिक सुलभ केले जाणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलसोबतच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म्स (RedBus, MakeMyTrip इ.) वरूनही प्रवाशांना तिकीट आरक्षित करण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना घरबसल्या मोबाईलवरून बसची वेळ, उपलब्ध सीट आणि मार्ग पाहून तिकीट बुक करता येईल.

खासगी संस्थेकडून मिळणार 'आतिथ्य' (Hospitality) सेवा

Advertisement

विमान प्रवासाच्या धर्तीवर एसटीच्या या व्होल्वो बसेसमध्ये प्रवाशांना उच्च दर्जाचा अनुभव देण्यासाठी खासगी नामांकित संस्थांची मदत घेतली जाणार आहे. प्रवाशांचे स्वागत, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि माहिती देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ (Bus Host/Hostess) तैनात केले जाईल, ज्यामुळे एसटीच्या पारंपरिक प्रवासाला आधुनिक हॉस्पिटॅलिटीची जोड मिळेल.

मागणी असलेल्या प्रमुख मार्गांचे सर्वेक्षण सुरू

महाराष्ट्रभरात तसेच इतर राज्यांत जाणाऱ्या ज्या आंतरराज्यीय मार्गांवर खासगी आराम बससेवेला मोठी मागणी आहे, अशा मार्गांचा आर्थिक व तांत्रिक दृष्टिकोनातून सर्वंकष अभ्यास केला जात आहे. प्रवासी संख्या, अंतर आणि कालावधीचा आढावा घेऊन हे नवे मार्ग निश्चित केले जातील.

"एसटीचा विश्वास अन् आधुनिकतेची जोड"

या उपक्रमाविषयी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "एसटीचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले असून नागरिकांचा यावर मोठा विश्वास आहे. या विश्वासाला आता आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल आरक्षण आणि दर्जेदार आतिथ्यसेवेची जोड देऊन लांब पल्ल्याच्या प्रवासात एसटीला पुन्हा अव्वल स्थानावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे."

?s=20

Comments

No comments yet.