अक्षय काळे, मुंबई (१८ सप्टेंबर २०२६) -
राज्यात यंदा बहुतांश भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, मका, तूर यांसारखी उभी पिके करपून गेली असून कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीने ९ प्रमुख उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या:
* तत्काळ दुष्काळ घोषणा:
औपचारिक निकषांची वाट न पाहता राज्यात त्वरित दुष्काळ किंवा दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून सवलती लागू कराव्यात.
* आर्थिक मदत:
शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना २५ हजार रुपयांची विशेष मदत द्यावी.
* कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदान:
कर्जमाफी योजनेची त्वरित अंमलबजावणी करून पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना १ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे आणि थकबाकीदार शेतकऱ्यांचाही यात समावेश करावा.
* पीकविमा संरक्षण:
१ रुपयात पीकविमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी. तसेच गेल्या वर्षीच्या अवकाळी नुकसानीची हेक्टरी १७ हजार रुपयांची मदत त्वरित वितरित करावी.
* रोजगार व फळबागांचे संरक्षण:
'मनरेगा'अंतर्गत जलसंधारण व शेतीची कामे सुरू करावीत आणि फळबागा वाचवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा.
* चारा छावण्या व पाणी:
टंचाईग्रस्त भागात शासकीय टँकर सुरू करावेत तसेच जनावरांसाठी चारा छावण्या आणि आरोग्य सेवा पुरवाव्यात.
* विद्युत रोहित्र दुरुस्ती मोहीम:
लोडशेडिंग आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ऊर्जा विभागाने रोहित्र दुरुस्तीची विशेष मोहीम राबवावी.
* नियंत्रण कक्ष:
प्रत्येक जिल्ह्यातील पर्जन्यमान, चारा व पाणीटंचाईवर रोज देखरेख ठेवण्यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर वॉर रूम/नियंत्रण कक्ष उभारावेत.
* विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्कमाफ: प्रभावित भागातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे केवळ परीक्षा शुल्क नव्हे, तर संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे.
ग्रामीण भागातील बिकट परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने दिलासा देईल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.