जळगाव, (प्रतिनिधी) १८ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र” अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील २३ ठिकाणी सकाळी १० वाजता रोजगार मेळावे होणार असून, याद्वारे युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित या मेळाव्यात नामांकित कंपन्या, उद्योग, रुग्णालये आणि शोरूम्सकडून तब्बल २ हजारांपेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत.
पात्रता आणि उपलब्ध पदे
या मेळाव्यात १० वी, १२ वी उत्तीर्ण, सर्व शाखांचे पदवीधर, ITI (सर्व ट्रेड), B.E., B.C.A., M.B.A., BAMS, BHMS, नर्सिंग यासह विविध शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहे.
या तालुक्यांमध्ये होणार मेळावे
जळगाव, भुसावळ, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, बोदवड, जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर आणि यावल या प्रमुख ठिकाणांसह २३ केंद्रांवर हे मेळावे पार पडतील.
असा घ्या सहभाग
इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंकद्वारे किंवा क्यूआर कोड स्कॅन करून आपली नोंदणी पूर्ण करावी. नोंदणीबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत ०२५७-२९५९७९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.