नाशिक महानगरपालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक ठरल्या ऐश्वर्या लाड जेजुरकर

Share:
Main Image
Last updated: 18-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ जानेवारी - नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविलेल्या ऐश्वर्या लाड जेजुरकर यांनी घवघवीत आणि ऐतिहासिक विजय मिळवत नाशिकच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे. तब्बल ९ हजार मतांचे निर्णायक आघाडी घेत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांचा दणदणीत पराभव केला असून, अवघ्या २८ व्या वर्षी त्या नाशिक महानगरपालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक ठरल्या आहेत. 

या विजयासह जेजुरकर परिवाराची नाशिक महानगरपालिकेत अधिकृत एन्ट्री झाली असून, सन १९९२ सालापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले आहे. अनेक वर्षांच्या सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक कार्याची पावती मतदारांनी या निवडणुकीत दिल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते.

Advertisement

उच्चशिक्षित, अभ्यासू आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या ऐश्वर्या लाड जेजुरकर यांच्या रूपाने नाशिक महानगरपालिकेला एक दूरदृष्टी असलेल्या आधुनिक विचारांचा आणि विकासाभिमुख नगरसेविका लाभल्या आहे. बी.ई. (कॉम्प्युटर) शिक्षण घेतलेले ऐश्वर्या जेजुरकर या नवे तंत्रज्ञान, पारदर्शक प्रशासन, डिजिटल सुविधा आणि शाश्वत विकास या विषयांवर ठोस काम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत त्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या पहिल्या पाच नगरसेवकांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. हा बहुमान त्यांच्या लोकप्रियतेची आणि मतदारांच्या विश्वासाची साक्ष देणारा आहे.

या ऐतिहासिक विजयामुळे नाशिकच्या राजकारणात तरुण आणि उच्चशिक्षित नेतृत्वाचा नवा चेहरा पुढे आला असून, आगामी काळात नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 “हा विजय माझा वैयक्तिक नसून, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मतदाराचा आहे. नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मी सातत्याने काम करणार आहे.” - ऐश्वर्या लाड जेजुरकर,नगरसेविका

Comments

No comments yet.