दिशा सालियन मृत्यू प्रकरण... विविध आरोपांवर आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगून टाकलं...

Share:
Main Image
Last updated: 16-Sep-2026

अक्षय काळे, (मुंबई) १६ सप्टेंबर - दिवंगत दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राजकीय हेतू आणि वैयक्तिक द्वेषापायी सातत्याने माझे नाव गोवून चारित्र्यहनन केले जात असल्याचा तीव्र संताप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. "मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी कोणतीही ओळख नव्हती. खोट्या प्रचाराने आम्हाला शांत बसवू पाहणाऱ्यांचा भ्रम लवकरच दूर होईल," असा थेट इशारा देत त्यांनी अधिकृत तपास यंत्रणांना निष्पक्षपातीपणे काम करू देण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियन प्रकरणात पुन्हा सुरू झालेल्या राजकीय चर्चा आणि आरोपांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर अधिकृत भूमिका मांडत विरोधकांना ठणकावले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेतील महत्त्वाचे मुद्दे:

ओळख नाही, भेटही नाही:

"अफवांचा धुरळा उडवणे बंद करण्यासाठी मी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य समोर मांडत आहे. मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही आणि त्यांच्याशी माझी कोणतीही ओळखही नव्हती," असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले.

६ वर्षांपासून हेतुपुरस्सर बदनामी:

या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा अथवा संबंध नसताना केवळ राजकीय हेतूने आणि चारित्र्यहननाच्या उद्देशाने गेल्या सहा वर्षांपासून काही घटकांकडून सातत्याने नाव जोडण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

Advertisement

टीव्हीवरील मीडिया ट्रायल्स म्हणजे सत्य नव्हे:

कुठलेही तथ्य नसताना टीव्ही वाहिन्यांवर आरडाओरड करून खोट्या चर्चा आणि ‘मीडिया ट्रायल्स’ चालवल्या जात आहेत. मात्र अशा गदारोळाने वास्तव बदलू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

तपास यंत्रणांना राजकीय हस्तक्षेपाशिवाय काम करू द्या:

"संबधित अधिकृत तपास यंत्रणांना कोणत्याही राजकीय दबावाशिवाय, व्यत्ययाशिवाय आणि चारित्र्यहननाशिवाय निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने तपास करू द्यावा," अशी मागणी त्यांनी केली.

अन्यायाविरुद्धचा लढा सुरूच राहणार:

अशा प्रकारच्या खोट्या मोहिमांनी आपल्या लढ्याला रोखता येईल हा विरोधकांचा निव्वळ भ्रम आहे. देशवासीयांना सोबत घेऊन सत्यासाठी आणि अन्यायाविरुद्धचा लढा कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

?s=20

Comments

No comments yet.