राज्यात आरोग्यसेवेची नवी क्रांती... या ५ शहरात होणार भव्य रुग्णालय... ४२५० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी...

Share:
Main Image
Last updated: 16-Sep-2026

अक्षय काळे, (मुंबई) १६ सप्टेंबर - महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य शासनाने ‘प्रगती’ (प्रगती हेल्थकेअर रिइमॅजिन्ड विथ ॲडव्हान्स्ड गव्हर्नन्स अँड ॲक्सेसीबल टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची एकूण किंमत ४,२५० कोटी रुपये आहे. यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) २,९७५ कोटी रुपयांचे कर्ज देणार असून उर्वरित १,२७५ कोटी रुपये राज्य शासन उपलब्ध करेल.

प्रमुख शहरांमधील रुग्णालयांचा विस्तार

प्रकल्पांतर्गत ५ प्रमुख शहरांमध्ये मोठ्या रुग्णालयांची उभारणी आणि विस्तार केला जाणार आहे:

कोल्हापूर: ५०० खाटांचे नवीन रुग्णालय

नांदेड: ५०० खाटांचे नवीन रुग्णालय

पुणे: २०० खाटांचे जागतिक दर्जाचे 'संदर्भ सेवा रुग्णालय' (Referral Hospital)

नागपूर: जिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० वरून ३०० खाटांपर्यंत वाढवणे

Advertisement

लातूर: जिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० वरून ३०० खाटांपर्यंत वाढवणे

डिजिटल आरोग्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

'महाराष्ट्र हेल्थ टेक्नॉलॉजी मिशन' अंतर्गत आरोग्य सेवांचे डिजिटल रूपांतर केले जाईल. यात ऑनलाइन रुग्ण नोंदणी, डिजिटल प्रयोगशाळा अहवाल, ई-प्रिस्क्रिप्शन आणि वैयक्तिक आरोग्य अभिलेख (Health Records) यांसारख्या सुविधा आयुष्मान भारत डिजिटल मिशनशी जोडल्या जातील. तसेच टेलिमेडिसिन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर निदानासाठी केला जाईल.

असा होईल सामान्य नागरिकांना फायदा

अतिरिक्त खर्चाला आळा: प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्येच लवकर निदान व उपचारांची सोय झाल्यामुळे नागरिकांचा खिशातील खर्च कमी होईल.

गंभीर आजारांवर विशेष लक्ष: उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांवर (NCDs) प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीवर भर दिला जाईल.

प्रभावी संदर्भ सेवा: प्राथमिक स्तरावर उपचार न होणाऱ्या रुग्णांना त्वरित उच्चस्तरीय रुग्णालयात पाठवण्यासाठी एक मजबूत आणि गतिमान यंत्रणा (Referral System) कार्यरत केली जाईल.

Comments

No comments yet.